अहिल्यानगर येथे आयोजित ‘इतिहास महाराष्ट्राचा’ स्पर्धेत मिळवले यश
लातूर (प्रतिनिधी) : बालरंगभूमी परिषदेच्या वतीने आयोजित, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘इतिहास महाराष्ट्राचा’ या राज्यस्तरीय स्पर्धेची अंतिम फेरी ९ ऑगस्ट रोजी अहिल्यानगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत लातूर केंद्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या दोन बालकलाकारांनी घवघवित यश संपादन करून लातूरचे नाव राज्यभर उज्वल केले आहे.
स्पर्धेच्या एकल सादरीकरण गटातून, कुमार गटात सहभागी झालेल्या कु. गार्गी नवलाजी जाधव हिने उत्कृष्ट सादरीकरण करत तृतीय (उत्तम) पारितोषिक पटकावले. तसेच, बाल गटातून सहभागी झालेली कु. रियांशी नरेश होणकर हिनेही आपल्या अभिनयाने परीक्षकांची मने जिंकून ‘उत्तेजनार्थ’ पारितोषिक मिळवले. या दोन्ही लातूरच्या कन्येनी ४४६ बालकलाकारांच्या स्पर्धेत हे यश मिळवून बालकलाकारांच्या विश्वात लातूरचा झेंडा रोवला आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रसिद्ध शाहीर डॉ. गणेश चंदनशिवे, अभिनेते दिगंबर नाईक आणि संजय हळदीकर या मान्यवर कलाकारांनी काम पाहिले. अशा नामांकित परीक्षकांसमोर सादरीकरण करून लातूरच्या या बालिकांनी लातूरच्या सांस्कृतिक चळवळीचं उज्ज्वल भविष्य महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे.
अंतिम फेरीच्या बक्षीस वितरण समारंभाचे उदघाटन बालरंगभूमी परिषदेच्या राज्य अध्यक्षा ॲड. निलमताई शिर्के-सामंत यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य उपाध्यक्ष ॲड. शैलेश गोजमगुंडे, उपाध्यक्षा दीपाताई क्षीरसागर, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, प्रभारी कार्यवाह योगेश शुक्ल, स्पर्धा प्रमुख दिपाली शेळके, सहकार्यवाह असेफ अन्सारी तसेच प्रांत कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
लातूरच्या या कन्यांच्या यशाबद्दल लातूर शाखेचे अध्यक्ष रणजित आचार्य, कार्याध्यक्ष मयूर राजापूरे, उपाध्यक्षा हिरा वेदपाठक, सुवर्णा बुरांडे, कोषाध्यक्ष रवी अघाव, वनिताताई गोजमगुंडे, विशाल वाटवडे, महेश बिडवे, महेश पवार, तेजश्री घवले, वसुधा पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.
खालील फोटोमध्ये गार्गी जाधव (पिवळ्या साडीत) आणि रियांशी होणकर (लाल ड्रेसमध्ये) मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारताना दिसत आहेत.

लातूर नेता डिजिटल वेबन्युज – बातमी

