साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन.
लातूर, दि 25 ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी थेट कर्ज योजनेचे १०० कर्ज प्रस्तावांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या योजनेसाठी लातूर जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील इच्छुक अर्जदारांनी २९ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. योजनेंतर्गत प्रति लाभार्थी रुपये एक लाखापर्यंत कर्ज उपलब्ध आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षे दरम्यान असावे. शहरी व ग्रामीण भागातील अर्जदारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये ३ लाखांपेक्षा जास्त नसावे. अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराने स्वत: मूळ कागदपत्रांसह कार्यालयात उपस्थित राहून अर्ज सादर करावेत. तृतीय पक्षामार्फत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. योजने अंतर्गत शेळीपालन, म्हैसपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, पंक्चर दुकान, वॉशिंग सेंटर, फळभाजी विक्री, हॉटेल व्यवसाय, फिरते साडी सेंटर, झाडू-टोपली निर्मिती, शिलाई मशिन/टेलरिंग, ब्युटी पार्लर, मसाला उद्योग, पापड उद्योग, फिरते कापड व्यवसाय, बेकरी, डोण-पत्रावळी, बांगडी व्यवसाय, गिफ्ट सेंटर इत्यादी व्यवसाय समाविष्ट आहेत.
जातीचा दाखला (महिला अर्जदारांसाठी दोन्ही नावांचा एकच दाखला असल्यास नोटरीकृत शपथपत्र), उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड (झेरॉक्स प्रती), दोन पासपोर्ट फोटो, व्यवसायाचे कोटेशन, जागेचा पुरावा (नमुना ८ अ, लाइट बिल, कर पावती, सातबारा), व्यवसायाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा अनुभव प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.), यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र आदी कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती अर्जासोबत जोडाव्यात.
अर्ज विनामूल्य उपलब्ध असून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळमजला, शिवनेरी गेट समोर, डाल्डा फॅक्टरी कंपाऊंड, लातूर येथे अर्ज स्वीकारले जातील. उद्दिष्टापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास, १४ मे २०१२ रोजीच्या शासन निर्णयानुसार लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाईल, असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले असुन अधिक माहितीसाठी 02382- 257050 संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

