‘स्पर्श बाल रुग्णालया’समोर नातेवाईकांचा तीव्र रोष व ठिय्या; पोलिसांनी घेतली धाव
लातूर (विशेष प्रतिनिधी): लातूर शहरातील रेणापूर नाका परिसरातील ‘स्पर्श बाल रुग्णालय’ येथे उपचारासाठी आलेल्या एका ११ वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रुती प्रवीण घनघावे (वय ११ वर्ष, रा. रामजी नगर, लातूर) असे या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णाला केवळ तपासणी आणि सलाईनची निडल काढण्याच्या बहाण्याने बोलावून पुन्हा भरती करून घेतले आणि चुकीच्या उपचारांमुळेच तिचा घात झाल्याचा गंभीर आरोप संतप्त नातेवाईकांनी केला आहे.
नेमकी घटना काय?
प्राप्त माहितीनुसार, श्रुती घनघावे ही पूर्णपणे बरी झालेली मुलगी स्वतः चालत रुग्णालयाचे चार मजले चढून वर आली होती. दिनांक २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता तिला डिस्चार्ज मिळालेला होता. केवळ फेरतपासणी (फॉलो-अप) आणि हातातील सलाईनची निडल काढण्यासाठी रुग्णालयाकडून बोलावण्यात आले होते.
मात्र, रुग्णालयात आल्यावर “सर्व काही व्यवस्थित आहे, फक्त एक सलाईन लावावी लागेल” असे सांगत तिला पुन्हा दाखल करून घेण्यात आले. सलाईन लावण्याच्या नावाखाली नेमके कोणते इंजेक्शन देण्यात आले, ज्यामुळे चालत आलेली मुलगी अचानक बेशुद्ध झाली आणि तिच्या नाक व तोंडातून रक्त बाहेर पडू लागले? असा थेट व संतप्त सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.
नातेवाईकांना भेटू न देता २४ तासांनंतर मृत्यूची माहिती!
दिनांक २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता दाखल केलेल्या या चिमुकलीजवळ दिनांक २३ ऑक्टोबर रोजी सकाळपर्यंत कुटुंबीयांना व नातेवाईकांना जाऊ दिले नाही, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर अचानक रुग्णालय प्रशासनाकडून मुलगी मृत पावल्याचे सांगण्यात आले.
“हसतखेळत आणि स्वतःच्या पायांवर चालत रुग्णालयात आलेली मुलगी अचानक मृत कशी होते? ही कोणती उपचार पद्धत आहे?” — संतप्त नातेवाईकांचा रुग्णालयाला सवाल
रुग्णालयासमोर तणावाचे वातावरण
या घटनेचे वृत्त पसरताच संतप्त नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी ‘स्पर्श बाल रुग्णालया’समोर मोठी गर्दी केली. रुग्णालयावर वैद्यकीय हलगर्जीपणाचा ठपका ठेवत दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
‘लातूर नेता’ विशेष नोंद / दुसरी बाजू:
दरम्यान, या गंभीर घटनेबाबत ‘लातूर नेता’ डिजिटल न्यूज टीमकडून आज सकाळपासून ‘स्पर्श बाल रुग्णालय’ प्रशासनाशी फोनवरून संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रुग्णालय प्रशासनाकडून फोन न उचलल्यामुळे व माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आल्यामुळे या घटनेबाबत रुग्णालयाची दुसरी बाजू समजू शकली नाही.

