लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक नफ्यात; १,७८० कोटींचे विक्रमी पीककर्ज वाटप!लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक नफ्यात; १,७८० कोटींचे विक्रमी पीककर्ज वाटप!

​विद्यमान चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत मांडला बँकेच्या प्रगतीचा प्रवास; विरोधकांना दिले आव्हानात्मक प्रत्युत्तर.

​लातूर नेता डिजिटल न्युज (प्रतिनिधी) :

सन १९८४ मध्ये स्थापन झालेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सहकार क्षेत्रात नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. बँकेचे विद्यमान चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत बँकेच्या ५ वर्षांच्या यशस्वी प्रगतीचा सविस्तर लेखाजोखा पत्रकारांसमोर मांडला. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘सहकार पॅनल’च्या वतीने शहरातील जुन्या एमआयडीसीतील हॉटेल भारत फाईनडाईन येथे ही पत्रकार परिषद पार पडली.

​यावेळी बोलताना चेअरमन धिरज विलासराव देशमुख म्हणाले की, बँकेचा वार्षिक ढोबळ नफा सलग चार वर्षे १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिला असून, बँकेने यंदा तब्बल १,७८० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यातील एकूण पीककर्ज वाटपात एकट्या जिल्हा बँकेचा सुमारे ६० टक्क्यांपेक्षा जास्त वाटा आहे.

​पत्रकार परिषदेस ‘सहकार पॅनल’चे उमेदवार हेमंत जाधव, सौ. संगीता अशोक पाटील निलंगेकर, प्रकाश पाटील बाकलीकर, दिलीप पाटील नागराळकर, प्रिती भोसले, आशिष पाटील, संतोष पाटील, जयेश माने, अशोक गोविंदपूरकर, जगन्नाथ पाटील, चंद्रशेखर दंडिमे, शेषेराव हाके, सौ. शीतल कल्याण पाटील, गितांजली लांडगे, सर्जेराव मोरे, विवेक सिरसाट, अविनाश जाधव यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

​विकासाचा भक्कम वारसा आणि पारदर्शक कारभार

​लोकनेते विलासराव देशमुख यांची विकासदृष्टी आणि सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे दूरदर्शी नेतृत्व यामुळे लातूर जिल्हा बँकेने भक्कम वाटचाल केली आहे. माजी मंत्री दिलीपराव देशमुख व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सहकार पॅनल’ ‘शिट्टी’ या चिन्हावर निवडणुकीत उतरले आहे.

  • ​निव्वळ नफा: बँकेच्या स्थापनेपासूनच्या ३८ वर्षांतील एकूण नफ्यापेक्षा २०७ कोटींचा अधिक निव्वळ नफा गेल्या ५ वर्षांत मिळवला आहे.
  • ​पारदर्शक नोकरभरती: पारदर्शक प्रक्रियेतून लातूर जिल्ह्यातील २६३ भूमिपुत्रांसह एकूण ३७५ उमेदवारांना नोकरी संधी देण्यात आली असून, यात ७० टक्के जागांवर स्थानिकांना प्राधान्य देण्यात आले आहे.

​कर्ज वितरण आणि शेतकरी कल्याणाला मोठी गती

  • ​कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत हजारो शेतकऱ्यांना थेट कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान मिळवून देण्यात आले आहे.
  • ​व्याजात सवलत: वेळेत कर्जफेड न करू शकलेल्या शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाच्या व्याजात ५ टक्के सूट देत केवळ ६ टक्के दराने कर्जवसुली करण्यात आली. याचा लाभ जिल्ह्यातील ७,३६८ शेतकऱ्यांना झाला.
  • ​विविध नवीन कर्ज योजना: चॉकी सेंटर, ट्रेलर, कंबाईन हार्वेस्टर आणि ड्रॅगन फ्रूट यांसारख्या नवीन योजना सुरू करून ३,७४२ शेतकरी सभासदांना १४८.९४ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले.

​उच्चशिक्षण, महिला सक्षमीकरण आणि जनकल्याण

  • ​परदेशात उच्चशिक्षण: शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या उच्चशिक्षणासाठी कर्जमर्यादा वाढवून आजपर्यंत ४९४ विद्यार्थ्यांना २५.१३ कोटी रुपयांचे शैक्षणिक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
  • ​महिला बचत गट: महिला बचत गटांची कर्जमर्यादा २ लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली असून, गटांसाठी स्वतंत्र १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
  • ​बँक तिथे इमारत: ‘बँक तिथे इमारत’ उपक्रमांतर्गत ग्रामीण भागात नवनवीन शाखा आणि स्वतःच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. तसेच ‘जिल्हा बँक आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत फिरत्या एटीएम व्हॅनच्या माध्यमातून शाखा नसलेल्या ४३५ गावांत बँकिंग सुविधा पोहोचवली जात आहे.

​विरोधकांच्या टीकेला स्पष्ट प्रत्युत्तर

​लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांनी कसलाही अभ्यास न करता बेछूट टीका सुरू केली असून अनेक गोष्टींचा विपर्यास केला जात आहे. यावर बोलताना चेअरमन धिरज देशमुख यांनी, “जिल्ह्याची सहकार चळवळ कोणाच्या हाती द्यायची हे सुज्ञ मतदार ठरवतील, पण विरोधकांनी विनाकारण टीका करण्यापेक्षा आपले ‘व्हिजन’ जनतेसमोर सांगावे,” असे जोरदार आव्हान केले.

You cannot copy content of this page

error: Content is protected !!