लातूरच्या शैक्षणिक क्रांतीचा महामेरू हरपला; माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधनलातूरच्या शैक्षणिक क्रांतीचा महामेरू हरपला; माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन

लातूर (प्रतिनिधी): लातूरच्या शैक्षणिक वैभवाचा पाया रचणारे, शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे लातूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून, एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा अंत झाला आहे.

‘लातूर पॅटर्न’चे शिल्पकार

​डॉ. गोपाळराव पाटील यांनी केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे, तर शिक्षण क्षेत्रातही ऐतिहासिक कार्य केले. त्यांनी स्थापन केलेल्या राजर्षी शाहू महाविद्यालयाने संपूर्ण महाराष्ट्राला ‘लातूर पॅटर्न’ची ओळख करून दिली. ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या जोरावर यशाची शिखरे कशी सर करता येतात, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच लातूरची शैक्षणिक ओळख आज राष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे.

संयमी आणि अभ्यासू नेतृत्व

​वैद्यकीय व्यवसायात बालरोगतज्ज्ञ म्हणून जनसेवा करत असतानाच त्यांनी राजकारणातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. राज्यसभा सदस्य म्हणून काम करताना त्यांनी वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार आणि रेल्वे यांसारख्या महत्त्वाच्या समित्यांवर अभ्यासपूर्ण योगदान दिले. एक मृदूभाषी, संयमी आणि विकासाभिमुख नेते म्हणून त्यांची ओळख होती.

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून श्रद्धांजली

लातूर पालकमंञी शिवेंद्रसिंह राजे भोसले
लातूर पालकमंञी शिवेंद्रसिंह राजे भोसले

​लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. श्रद्धांजली अर्पण करताना ते म्हणाले की,

​”डॉ. गोपाळराव पाटील यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. आम्ही एका थोर मार्गदर्शकाला मुकलो आहोत.”

​डॉ. गोपाळराव पाटील यांच्या पश्चात त्यांचा मोठा परिवार आणि शिष्यवर्ग असून, त्यांच्या निधनावर विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून शोक व्यक्त केला जात आहे.

You cannot copy content of this page

error: Content is protected !!