'माऊली'च्या चरणी सुनेत्रावहिनी अजितदादा पवार; वारकऱ्यांसोबत घेतले सहभोजनाचा आनंद.
सासवड | प्रतिनिधी :
अखंड हरिनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा ताल आणि भक्तीचा अथांग सागर… अशा चैतन्यमयी वातावरणात राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी आज सासवड येथे जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी वारकऱ्यांसोबत जमिनीवर बसून सहभोजन करत वारीच्या समतेच्या संस्कृतीचे दर्शन घडविले.
राज्याच्या सुख-समृद्धीसाठी साकडं
सासवडच्या पालखीतळावर पोहोचल्यावर श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांनी अत्यंत भक्तिभावाने माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला सुख, शांती आणि समृद्धी लाभो, अशी प्रार्थना केली. ‘ज्ञानोबा-माऊली’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
वारीच्या परंपरेचे जपले पावित्र्य
केवळ दर्शन घेऊन न थांबता, सुनेत्रावहिनींनी वारीच्या सेवाभावी परंपरेचे दर्शन घडवले. त्यांनी पालखी सोहळ्यातील वारकरी आणि पालखी प्रमुखांसोघबत खाली जमिनीवर बसून सहभोजनाचा आस्वाद घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या वारीतील प्रवासाचे अनुभव ऐकून घेतले.
काय म्हणाल्या सुनेत्रावहिनी?
“वारी म्हणजे केवळ चालणे नव्हे, तर ती समता, सेवा आणि प्रेमाची शिकवण देणारी एक महान परंपरा आहे. वारकऱ्यांसोबत बसून जेवताना जो अनुभव मिळाला, तो खरोखरच अविस्मरणीय आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
प्रमुख उपस्थिती
यावेळी त्यांच्यासोबत पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री वीरधवल जगदाळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.