नांदेड | प्रतिनिधी: लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद कन्या प्रशाला, भादा (ता. औसा) येथे कार्यरत आणि महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक शिवलिंग उमाकांत नागापुरे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने ‘शिक्षणशास्त्र’ विषयात पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे.
संशोधनाचा विषय आणि महत्त्व:
डॉ. नागापुरे यांनी स्वामी विवेकानंद अध्यापक महाविद्यालय, उदगीरचे प्राचार्य डॉ. गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली “लातूर जिल्ह्यात इंस्पायर अवार्ड्स मानक योजनेमुळे विद्यार्थ्यांत विकसित होणारी संशोधनवृत्ती, सृजनशीलता व सामाजिक उपयोगितेचा अभ्यास“ या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला होता. विशेष म्हणजे, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ‘इंस्पायर अवार्ड्स मानक’ या योजनेवर पीएच.डी. स्तरावर होणारे हे देशातील दुसरे आणि महाराष्ट्रातील पहिलेच संशोधन ठरले आहे.
मौखिक परीक्षेचा समारोप:
नांदेड विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र संकुलात झालेल्या मौखिक परीक्षेत डॉ. नागापुरे यांनी आपल्या प्रबंधाचे यशस्वी सादरीकरण केले. या परीक्षेला आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. चंद्रकांत बाविस्कर, बहिस्थ परीक्षक प्रा. डॉ. वैभव जाधव (पुणे विद्यापीठ) आणि संचालिका प्रा. वैजयंता पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव:
डॉ. नागापुरे यांच्या या यशाबद्दल शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी, विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, सहकारी शिक्षक, विद्यार्थी आणि मित्रपरिवारामधून त्यांचे अभिनंदन होत आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्रमोद पवार, संजय क्षीरसागर तसेच पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
एका सरकारी शाळेत कार्यरत राहून, संशोधनाची जोड देत साध्य केलेले हे यश इतर शिक्षकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.


