लातूर हादरले! कुत्र्यांच्या हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट मनपाच्या पायऱ्यांवर ठेवला!
लातूर (प्रतिनिधी) : शहरातील भटक्या कुत्र्यांचा हैदोस आता निष्पाप नागरिकांच्या जीवावर उठला आहे. लातूर महानगरपालिका प्रशासनाच्या उघड्या डोळ्यांदेखत भटक्या कुत्र्यांनी एका २२ वर्षीय तरुण गमावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भयंकर प्रकारामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी थेट मृतदेह महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर आणून ठेवत मनपा प्रशासनाविरुद्ध तीव्र आक्रोश आणि रोष व्यक्त केला. तब्बल २ ते ३ तास चाललेल्या या थरारानंतर मनपाने लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर मनपा हद्दीतील भुई गल्ली परिसरातील रहिवासी विलास उत्तम गोरवे (वय अंदाजे २२ वर्ष) हा तरुण सोमवार, दिनांक १८ मे रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडला होता. याच वेळी चार ते पाच हिंस्त्र भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर अचानक जीवघेणा हल्ला चढवला.
कुत्र्यांनी विलासच्या हातावर, पायावर आणि थेट मानेवर गंभीर लचके तोडले. या हल्ल्यात विलास रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तात्काळ ‘विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत’ (GMC) उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, मृत्यूशी झुंज अपयशी ठरून बुधवार, दिनांक २० मे रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
लातूर हादरले! कुत्र्यांच्या हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट मनपाच्या पायऱ्यांवर ठेवला!
विलासच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण भुई गल्ली परिसरात शोककळा पसरली आणि नागरिकांचा संयम सुटला. या मृत्यूला पूर्णपणे महानगरपालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा थेट आरोप करत, गुरुवार दिनांक २१ मे रोजी नातेवाईकांनी विलासचा मृतदेह थेट महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या पायऱ्यांवर आणून ठेवला.
“मनपा प्रशासन झोपले आहे का? आमच्या निष्पाप मुलाचा बळी घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे!” अशा घोषणांनी संपूर्ण मनपा परिसर दणाणून गेला होता. सुमारे दोन ते तीन तास मनपाच्या प्रवेशद्वारावर मोठा गोंधळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मनपाची अखेर माघार; दोषींवर निलंबन आणि आर्थिक मदतीचे लेखी आश्वासन!
नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा आणि वाढता जनक्षोभ पाहून महानगरपालिका प्रशासनाचे धाबे दणाणले. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत नातेवाईकांशी चर्चा केली. प्रशासनाने खालील मागण्यांचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच नातेवाईकांनी मृतदेह अंत्यविधीसाठी ताब्यात घेतला:
दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई केली जाईल.
पीडित गोरवे कुटुंबाला महानगरपालिकेकडून तात्काळ आर्थिक सहाय्य (अर्थसहाय्य) दिले जाईल.
सर्वात मोठा सवाल: मनपाचे टेंडर मुंबईला, मग लातूरकरांचे जीव टांगणीला का?
लातूर हादरले! कुत्र्यांच्या हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट मनपाच्या पायऱ्यांवर ठेवला!
शहरात दिवस असो वा रात्र, भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट आणि हल्ले सत्र सातत्याने सुरूच आहे. असे असताना लातूर मनपाने कुत्र्यांच्या नसबंदीचे आणि नियंत्रणाचे टेंडर थेट मुंबईच्या कंपनीला दिल्याची माहिती समोर येत आहे.
लातूरकरांच्या करातून गोळा होणारा पैसा मुंबईच्या कंपन्यांना दिला जातो, मग शहरात कुत्र्यांचा बंदोबस्त का होत नाही?
अजून किती विलासचे बळी गेल्यावर मनपा प्रशासनाला जाग येणार?
हा केवळ अपघात नसून प्रशासकीय अनास्थेमुळे झालेला ‘बळी’ असल्याच्या भावना लातूरकरांमधून व्यक्त होत आहेत. आता तरी लातूर मनपा शहरातील भटक्या कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.