देवणीत मगरीचा पुन्हा तीन तास थरार; पोलिसांच्या मदतीने महाकाय मगर जेरबंद!देवणीत मगरीचा पुन्हा तीन तास थरार; पोलिसांच्या मदतीने महाकाय मगर जेरबंद!

​मांजरा पात्रातील कोरड्याठाक वातावरणामुळे वन्यजीवांचा शेतात आश्रय; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

​देवणी (प्रतिनिधी) :

देवणी पोलीस ठाणे हद्दीतील देवणी खुर्द येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील उसात महाकाय मगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे स्थानिक सर्पमित्र आणि वनविभागाने तब्बल तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर या महाकाय मगरीला यशस्वीरीत्या जेरबंद केले आहे. हे रेस्क्यू ऑपरेशन अतिशय अचूक पद्धतीने आणि थेट पोलिसांच्या मदतीने पार पडल्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक अण्णाराव खोडेवाड यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

​या परिसरात घडलेली ही दुसरी घटना असून, यापूर्वीच १४ सप्टेंबर रोजी याच परिसरात पूर्ण वाढ झालेली एक नर मगर पोलीस, सर्पमित्र व वनविभागाच्या संयुक्त पथकाने पकडली होती.

देवणीत मगरीचा पुन्हा तीन तास थरार; सर्पमित्र व वन विभागाने पोलिसांच्या मदतीने केले जेरबंद! यावेळी सर्पमित्र भीमाशंकर गाडवे, सिद्धार्थ चव्हाण, मनोज पाखरे, अमोल गेजगे, आशीष कल्लूरे आदी उपस्थीत होते

​पावसाअभावी मांजरा पात्राचे पात्र कोरडे

​हंगामी पाऊस कमी झाल्यामुळे देवणी परिसरातील मांजरा नदीचे विस्तृत पात्र कोरडे पडले आहे. वातावरणातील बदलामुळे सरपटणारे प्राणी थंडावा आणि ओलावा शोधण्यासाठी शेतातील उसाच्या पिकात आश्रय घेत आहेत.

​त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात दिवस व रात्री वावरताना आवश्यक ती सुरक्षा काळजी घ्यावी, तसेच कोणत्याही आपत्कालीन मदतीसाठी वनविभागाच्या १९२६ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन देवणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णाराव खोडेवाड यांनी केले आहे.

देवणीत मगरीचा पुन्हा तीन तास थरार; पोलिसांच्या मदतीने महाकाय मगर जेरबंद! ​मांजरा पात्रातील कोरड्याठाक वातावरणामुळे वन्यजीवांचा शेतात आश्रय; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

​वनविभागात प्रशिक्षितांची कमतरता; सर्पमित्रांचा मोठा आधार

​धाराशिव वनविभागांतर्गत येणाऱ्या तुळजापूर, येडशी, उमरगा, लातूर, देवणी, उदगीर, कासारशिरशी, शहाजनी, औराद, रेणापूर व जळकोट परिसरात मागील अनेक दिवसांपासून वाघ, बिबट्या, तरस, पिसाळलेले लांडगे, मगर आणि अजगरांसारख्या हिंस्र प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

​१९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार या प्राण्यांना मानवी वस्तीतून सुरक्षित पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन करणे बंधनकारक आहे; परंतु वनविभागाकडे यासाठी पुरेसा प्रशिक्षित स्टाफ उपलब्ध नसल्याची खंत सर्पमित्र भीमाशंकर गाडवे यांनी व्यक्त केली आहे.

सर्पमित्र भीमाशंकर गाडवे

​प्रशिक्षणाची नवीन दिशा

​मराठवाड्यात पावसाचे प्रमाण घटल्यामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक बदलांचा परिणाम मानवाप्रमाणेच वन्यजीवांच्या जीवनशैलीवरही होत आहे. निसर्ग, वन्यजीव आणि मानवांच्या सुरक्षेसाठी पावले उचलत आता धाराशिव वनविभागांतर्गत वाघ, बिबट्या आणि मगरींसारख्या प्राण्यांना सुरक्षित पकडण्यासाठी वन अधिकारी, कर्मचारी आणि वनविभागाचे ओळखपत्र धारक सर्पमित्रांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती लातूरचे सहाय्यक वन संरक्षक श्री धनंजय पोटे यांनी दिली आहे.

सहाय्यक वन संरक्षक श्री धनंजय पोटे

​📲 अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी ‘लातूर नेता डिजिटल वेब न्यूज’शी जोडलेले रहा!

You cannot copy content of this page

error: Content is protected !!