खाकी डागाळली! लातूरमध्ये पोलिसांकडूनच तरुणाला बेदम मारहाण; "एस.पी. साहेबांना तक्रार केली तर ठार मारू" अशी धमकी.
लातूर/निलंगा (प्रतिनिधी): लातूर जिल्हयातील निलंगा तालुक्यातील निटुर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका सामान्य नागरिकाला गावातील काही व्यक्तींसह पोलिसांनीच अमानुष मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय ?
बुजरुगवाडी येथील आनंद हरी जाधव (वय ३१) यांनी दिलेल्या अर्जानुसार, ९ मार्च रोजी सायंकाळी ते निटूर बाजारात खरेदी करत असताना विकास पाटील व त्याच्या चार साथीदारांनी त्यांचा पाठलाग केला. यावेळी त्यांना जातिवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित व्यक्तींनी स्वतःच पोलिसांना बोलावून जाधव यांना पोलीस ठाण्यात नेले.
पीडित जाधव यांनी केलेल्या आरोपांनुसार, पोलीस ठाण्यात नेल्यानंतर हेड कॉन्स्टेबल सुधीर शिंदे, लक्ष्मण तुकाराम कांबळे (उर्फ पप्पू), इतर पोलीस कर्मचारी आणि स्थानिक पोलीस पाटील विलास पाटील यांनी त्यांना अत्यंत क्रूर वागणूक दिली. त्यांचे हात बांधून, त्यांना पायावर उभे ठेवून रात्री उशिरापर्यंत बाभळीच्या काठीने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तर “बेशुद्ध होईपर्यंत ही मारहाण सुरू होती,” असा दावा जाधव यांनी केला आहे.
तक्रार नोंदवण्यास नकार आणि जीवे मारण्याची धमकी. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या जाधव यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु ‘पोलीस पत्र’ नसल्याच्या तांत्रिक कारणास्तव उपचारात विलंब झाला. पीडिताच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता, ती नोंदवून घेण्यास नकार देण्यात आला. इतकेच नव्हे तर, १३ मार्च रोजी केळगाव जंगल परिसरात पुन्हा संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी जाधव यांना बोलावून “एस.पी. साहेबांना तक्रार केली तर ठार मारू” अशी उघड धमकी दिल्याचेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.
सामाजिक संताप आणि कारवाईची मागणी.
या प्रकरणातील जातिवाचक शिवीगाळ आणि पोलिसांचा कथित सहभाग यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. भटक्या विमुक्त संघटनेचे प्रदेश अध्यक्ष हरिभाऊ गायकवाड यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता सर्वांचे लक्ष लातूर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेकडे लागले असून, पीडिताला न्याय मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान निटुर येथील संबंधित पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर शिंदे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता लातूर नेता न्युजशी बोलताना हे प्रकरण खोटे असल्याचा दावा करत पीडित आनंद हरी जाधव यांच्यावरच दिनांक ०९ मार्च रोजी BNS ११५(२), ३५२, ३५१(२) प्रमाणे एनसीआर दाखल केला आहे अशी माहिती दिली आहे.