केवळ तीनच दिवसांत तब्बल २३ लाख ५७ हजारांचा दंड! लातूर पोलिसांच्या 'सक्ती'ने वाहनचालकांच्या खिशाला कात्री; नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रियाकेवळ तीनच दिवसांत तब्बल २३ लाख ५७ हजारांचा दंड! लातूर पोलिसांच्या 'सक्ती'ने वाहनचालकांच्या खिशाला कात्री; नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया

लातूर प्रतिनिधी: दुचाकीस्वारांच्या सुरक्षेचा हवाला देत लातूर पोलीस विभागाने जिल्ह्यात हाती घेतलेल्या हेल्मेट सक्तीच्या मोहिमेने अवघ्या तीन दिवसांतच रेकॉर्डब्रेक आकडेवारी गाठली आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या या धडक कारवाईत केवळ तीन दिवसांच्या आत तब्बल २३५७ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, याद्वारे थेट २३ लाख ५७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पोलिसांकडून हा उपक्रम नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि प्राण वाचवण्यासाठी असल्याचे सांगितले जात असले, तरी अवघ्या ७२ तासांत लाखांच्या घरात गेलेली ही वसुली पाहून “हा सुरक्षेचा उपाय आहे की दंड वसुलीचा सपाटा?” असा संतप्त सवाल आता लातूरकरांमधून विचारला जात आहे.

“सुरक्षेची काळजी की थेट खिशाला कात्री?” – नागरिकांचा सवाल

लातूर पोलिसांनी हेल्मेट सक्ती ही केवळ शिक्षेचा भाग नसून जीवन सुरक्षित करण्याची मोहीम असल्याचे वारંवार स्पष्ट केले आहे. मात्र, अंमलबजावणीच्या सुरुवातीच्या केवळ तीनच दिवसांत हजारो वाहनचालकांना लाखा-दिलाखांचे फटके बसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून मोठा रोष व्यक्त होत आहे. प्रशासनाने अचानक ही मोहीम तीव्र करण्यापूर्वी किमान काही दिवस विना-दंड केवळ जनजागृती मोहीम राबवायला हवी होती, अशी भावना वाहनचालक व्यक्त करत आहेत. या धडक कारवाईमुळे ग्रामीण भागातून आणि छोट्यामोठ्या कामांसाठी शहरात येणाऱ्या सामान्य कामगार व शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनाचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

तीन दिवसांतील लाखांची वसुली चर्चेचा विषय

जिल्हाभरात अवघ्या तीन दिवसांत २३५७ केसेस नोंदवून थेट २३ लाख ५७ हजारांचा महसूल गोळा झाल्याची आकडेवारी समोर आल्यानंतर या मोहिमेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. “जीव वाचवण्यासाठी हेल्मेट गरजेचे आहे यात तीळमात्र शंका नाही, पण दंडाचा बडगा उगारून अवघ्या तीन दिवसांत लाखो रुपये उकळणे कितपत न्याय्य आहे?” अशी विचारणा त्रस्त वाहनचालकांकडून केली जात आहे.

वैद्यकीय जनजागृती आणि पोलिसांची ठाम भूमिका

दुचाकी अपघातांमध्ये डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापती टाळण्यासाठी आणि जीवितहानी रोखण्यासाठी हेल्मेट किती वरदान ठरते, याबाबत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहिते यांनीही व्हिडिओच्या माध्यमातून मोलाचे प्रबोधन केले आहे. तसेच, जोपर्यंत जिल्ह्यात १०० टक्के हेल्मेटचा वापर होत नाही, तोपर्यंत हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे. हेल्मेट हे ओझे नसून कुटुंबाचे सुरक्षा कवच आहे, अशी ठाम भूमिका पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी मांडली आहे.

नव्या मोहिमेसमोर विश्वासाचे मोठे आव्हान

लातूर पोलिसांची ही हेल्मेट सक्ती जरी नागरिकांच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी असली, तरी अवघ्या तीन दिवसांत झालेला दंडात्मक कारवाईचा अतिरेक जनमानसात संभ्रम आणि नाराजी निर्माण करणारा ठरला आहे. पोलिसांचा उद्देश खरोखरच नागरिकांचे प्राण वाचवण्याचा असेल, तर तो दंड आकारण्यापेक्षा समुपदेशन आणि प्रबोधनाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे साधता आला असता, अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. त्यामुळे या दंड वसुलीच्या वादळात लातूर पोलीस प्रशासनाला सर्वसामान्य नागरिकांचा खरा विश्वास आणि जनसहभाग कसा मिळवता येतो, हे आगामी काळच ठरवणार आहे.

You cannot copy content of this page

error: Content is protected !!