लातूर प्रतिनिधी :
खोरी गल्ली परिसरात मुसळधार पावसामुळे उघड्या नाल्यात पडलेल्या एका आईसह तिच्या दोन मुलांचे प्राण वाचविणाऱ्या स्थानिक तरुणांच्या धाडसाचे कौतुक करत, भारतीय जनता पार्टीचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
- अचानक झालेला अपघात: मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुराच्या प्रवाहात शेख भाभी आणि त्यांची दोन मुले (आरीफ शेख व असिफ शेख) अचानक उघड्या नाल्यात पडली.
- २५० फूट वाहून गेले: पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने तिघेही नाल्यात सुमारे २५० फूट वाहून गेले.
- धाडसी बचावकार्य: प्रसंगावधान राखत स्थानिक तरुण आमेर पठाण, सय्यद सिराज भाई, शेख आवेस भाई, हाशम मुनशी आणि शारिक खान यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दोन वेगवेगळ्या ओपनिंगजवळून तिघांनाही सुरक्षित बाहेर काढले.
उघड्या नाल्यांचा प्रश्न ऐरणीवर; सुरक्षेची मागणी
या दुर्घटनेनंतर परिसरातील उघड्या नाल्यांचा गंभीर प्रश्न पुन्हा समोर आला आहे. परिसरात शाळा असल्याने भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज कव्हेकर यांनी व्यक्त केली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा केली आहे.
“हा सन्मान धाडसाचा नसून माणुसकीचा आहे” – अजित पाटील कव्हेकर
“शहरातील धोकादायक व उघड्या नाल्यांवर महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात. संकटसमयी माणुसकी दाखवत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिघांचे प्राण वाचविणाऱ्या या शूरवीरांच्या धाडसाला आमचा शतशः सलाम आहे.”

