राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांना शासनाचा 'डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार' प्रदानराजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांना शासनाचा 'डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार' प्रदान

पुणे / लातूर (दि. ०७ सप्टेंबर २०२६) : शिव छत्रपती शिक्षण संस्था संचलित येथील नामांकित राजर्षी शाहू महाविद्यालयाचे (अधिकारदप्रदत्त स्वायत्त संस्था) प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचा मानाचा “डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार” (प्राचार्य संवर्ग) प्रदान करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना. चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या शुभहस्ते हा सर्वोच्च बहुमान प्राचार्य डॉ. गव्हाणे यांना प्रदान करण्यात आला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेल्या या सोहळ्यास राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मुख्य अपर सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. प्रमोद नाईक, कला संचालनालयाचे संचालक तथा निमंत्रक डॉ. किशोर इंगळे, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर तसेच कुलसचिव प्रा. डॉ. प्रफुल्ल पवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान

प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी महाविद्यालयात स्मार्टबोर्डसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. गुणवत्तापूर्ण संशोधन, प्रशासकीय शिस्त आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सातत्याने राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम अत्यंत उल्लेखनीय ठरले आहेत. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली राजर्षी शाहू महाविद्यालयाने शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्षवेधक कामगिरी नोंदवली आहे. त्यांच्या याच निःस्पृह आणि समर्पित कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरविले आहे.

राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांना शासनाचा ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

शैक्षणिक वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव

या ऐतिहासिक बहुमानाबद्दल शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजय जाधव, उपाध्यक्ष डॉ. शिवाजीराव सूर्यवंशी, सचिव बी. बी. ठोंबरे, सहसचिव उद्धवराव पाटील, सहसचिव सच्चिदानंद पाटील, संस्था सदस्य प्राचार्य रावसाहेब कावळे, श्री. शिवाजीराव पाटील, श्रीमती विजयाताई पाटील, श्रीमती शुभांगी सूर्यवंशी-काळे, श्री. धर्मराज हल्लाळे, श्री. शिवाजी भोसले, श्री. अमर देशमुख, श्री. प्रकाश देशमुख व श्री. शामराव पाटील यांनी आनंद व्यक्त करत प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

तसेच संस्थेचे माजी उपाध्यक्ष डॉ. पी. आर. देशमुख, माजी सचिव अनिरुद्ध जाधव, नियामक मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी डॉ. महादेव गव्हाणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. लातूरच्या शैक्षणिक शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page

error: Content is protected !!