मराठा आरक्षणासाठी ४२ वर्षीय तरुणाची टोकाची पावलं; सुसाईड नोट लिहून लातूरमध्ये केली विहिरीत उडीमराठा आरक्षणासाठी ४२ वर्षीय तरुणाची टोकाची पावलं; सुसाईड नोट लिहून लातूरमध्ये केली विहिरीत उडी

मृतदेह महामार्गावर ठेवून संतप्त गावकऱ्यांचा चक्काजाम; जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह न घेण्याची भूमिका

लातूर नेता न्युज प्रतिनिधी: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाबाबत एक अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना लातूर जिल्ह्यातून समोर आली आहे. लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सुमठाणा येथील ४२ वर्षीय तरुण सुनील विनायक बिरादार यांनी मराठा आरक्षणासाठी विहिरीत उडी मारून आपले जीवन संपवले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून मराठा समाजात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.

मंगळवारी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास सुनील बिरादार यांनी गावातीलच एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली, ज्यामध्ये त्यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात यश आले. मृत्यूनंतर त्यांच्याजवळ एक चिठ्ठी सापडली असून, त्यात ‘मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी माझे जीवन संपवत आहे’, असा स्पष्ट मजकूर लिहिलेला आहे.

आंदोलकांचा चक्काजाम आणि मुख्य मागण्या : घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी मृतदेह थेट उदगीर-लातूर महामार्गावर ‘मोड’ येथे आणून ठेवत चक्काजाम आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आंदोलकांकडून प्रामुख्याने दोन मागण्यांवर जोर दिला जात आहे: १. मयताच्या कुटुंबातील एका सदस्याला तातडीने शासकीय नोकरी दिली जावी. २. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने आपली ठोस भूमिका स्पष्ट करावी.

कुटुंबीयांनी आणि आंदोलकांनी जोपर्यंत प्रशासनाकडून या मागण्यांवर लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्या घटनास्थळी पोलीस आणि महसूल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले असून आंदोलकांशी चर्चा सुरू आहे. मात्र, जोपर्यंत ठोस लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याच्या भूमिकेमुळे शिरूर अनंतपाळ परिसरात सध्या तणावाचे वातावरण कायम आहे.

या दुर्दैवी घटनेची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पाहत राहा – ‘लातूर नेता न्यूज’.

You cannot copy content of this page

error: Content is protected !!