पाणी आणि चारा टंचाईवर मात करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
लातूर नेता डिजिटल न्युज:
मान्सून २०२६ मध्ये झालेली पर्जन्यमानातील घट आणि पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, लातूर जिल्ह्यातील सर्व दहाही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना व पशुधनाला दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष आढावा बैठक पार पडली. दुष्काळ निवारण कामकाजाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आता जिल्हास्तरावर ‘वॉर रूम’ (दुष्काळ निवारण कक्ष) स्थापन करण्यात आली आहे.

बैठकीतील ठळक मुद्दे आणि घेतलेले निर्णय:
- १४ सदस्यीय विशेष पथक: आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या या वॉर रूममध्ये महसूल, महानगरपालिका, कृषी, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम आणि नगर परिषद विभागातील अधिकार्यांचा समावेश करण्यात आला असून विषयनिहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- पाणी व चारा टंचाईचे सूक्ष्म नियोजन: पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी पर्यायी जलस्त्रोत अगोदरच निश्चित करून ठेवण्याचे तसेच चारा उपलब्धतेचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- अवैध जोडण्यांवर कारवाई: लातूर शहर पाणीपुरवठा जलवाहिनीच्या अवैध जोडण्या तातडीने तोडण्यात याव्यात आणि गळतीची दुरुस्ती त्वरित पूर्ण करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
- नुकसान पंचनामे आणि सवलती: शासनाच्या वतीने लागू करण्यात आलेल्या १२ प्रकारच्या सवलती आणि नुकसान भरपाईचे पंचनामे तात्काळ सुरू करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
© लातूर नेता डिजिटल वेब न्यूज


