पुन्हा राञी वस्तीगृहात घुसून विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; मि “प्राचार्य होणार आहे; बघुन घेतो” ची धमकी.
अहमदपुर येथील थोरलेवाडीत क्राइस्ट इंटरनॅशनल स्कुलच्या वस्तीगृहात धक्कादायक प्रकार; शिक्षण क्षेञाला काळिमा फासणारा घटना.
अहमदपूर प्रतिनिधी : तालुक्यातील थोरली वाडी शिवारात असलेल्या क्राइस्ट इंटरनॅशनल स्कुलच्या वस्तीगृहात २१ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री गंभीर प्रकार घडला असून मोटारसायकलचे नुकसान झाल्याच्या संशयावरून एकाने हॉस्टेलमध्ये घुसून जवळपास ३० विद्यार्थ्यांना काठीने जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन अहमदपूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ८१/२०२६ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या घटनेची फिर्याद स्कूलचे प्राचार्य जैबाबेरला प्रपीन नाडर (वय ४२) यांनी दिली आहे. फिर्यादीनुसार, आरोपी उज्वल प्रकाश सोनी (रा. बैतुल बाजार, मध्यप्रदेश) याने विद्यार्थ्यांनी त्याच्या मोटारसायकलचे नुकसान केल्याचा संशय व्यक्त करत संतापाच्या भरात वस्तीगृहात घुसून शिवीगाळ केली व काठीने विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली तर “मी प्राचार्य होणार आहे. तेव्हा तुम्हाला बघतो,” अशी धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
घटनेत काही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले होते. उपचारानंतर प्राचार्यांनी २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०७:३० वाजण्याच्या दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर येथे तक्रार दाखल केली आहे. भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह बालन्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियम अंतर्गत कलम ७५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक नेत्रेवार यांच्या आदेशानुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या घटनेनंतर पालकांमध्ये चिंतेचे व भितीचे वातावरण निर्माण झाले असून पालकांमधे रोष व्यक्त केला जात आहे. शिक्षण क्षेञात वारंवार घडत असलेल्या घटनांमुळे शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिक्षणाधिकारी व जिल्हाधिकारी अश्या घटना गांभीर्यपूर्वक घेतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तर पुढील तपास सुरु असल्याची माहिती आज दि २३ फेब्रुवारी रोजी दुपारी पोलिसांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितली आहे.

