भीषण अपघात: आजोळी यात्रेला निघालेल्या शिऊरच्या तरुणाचा जागीच मृत्यू; 'कवठा पाटी'जवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडकभीषण अपघात: आजोळी यात्रेला निघालेल्या शिऊरच्या तरुणाचा जागीच मृत्यू; 'कवठा पाटी'जवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक

निलंगा: निलंगा तालुक्यातील कवठा पाटी ते तुपडी दरम्यान आज दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात शिऊर येथील २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सोहेल रहीम शेख असे मृत तरुणाचे नाव असून, तो घराचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, निलंगा तालुक्यातील शिऊर येथील सोहेल शेख हा आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास आपल्या आजोळी तुपडी येथे जाण्यासाठी दुचाकीवरून निघाला होता. तुपडी येथे सध्या मक्कामाँ दर्गाहचा उरुस (यात्रा) सुरू आहे. सोहेलची आई आणि बहीण आधीच यात्रेसाठी आजोळी गेले होते, त्यांना भेटण्यासाठी सोहेल आनंदाने घराबाहेर पडला होता.

​मात्र, कवठा पाटी आणि तुपडी दरम्यान असलेल्या खडिकेंद्रजवळ सोहेलच्या दुचाकीची (MH 24 Y 9778) समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी (MH 24 AL 8410) भीषण धडक झाली. दोन्ही गाड्यांचा वेग जास्त असल्याने हा अपघात इतका भयानक होता की सोहेलचा जागीच मृत्यू झाला.

दुसरा चालक गंभीर जखमी

​या अपघातात दुसरी दुचाकी चालवणारा तरुण (रा. कवठा पाटी) हा देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

शिऊर गावावर शोककळा

​सोहेल हा त्याच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. उरुसाच्या आनंदाने आजोळी निघालेल्या मुलाचा असा दुर्दैवी अंत झाल्याचे समजताच त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. या घटनेची माहिती मिळताच शिऊर आणि तुपडी परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

महत्वाची टीप: रस्त्यावरून प्रवास करताना वेगावर नियंत्रण ठेवा आणि हेल्मेटचा वापर करा, जेणेकरून असे दुर्दैवी प्रसंग टाळता येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!