लातूर (प्रतिनिधी): रस्ते अपघातात सुरक्षिततेचे नियम किती महत्त्वाचे ठरतात, याचा प्रत्यय लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात आला आहे. एका भीषण अपघातात कारने दोनदा पलटी घेऊनही केवळ सीट बेल्टच्या वापरामुळे मोठा अनर्थ टळला असून प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, निलंगा तालुक्यातील माकणी थोर येथील मारुती लिंबाजी सूर्यवंशी हे आपल्या कुटुंबासह कोल्हापूरहून देवदर्शन करून गावी परतत होते. २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७ च्या सुमारास बोरफळ गावाजवळ त्यांच्या मारुती सुझुकी इको (MH-24 BX 1979) कारने पुढच्या ट्रॅव्हल्सला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारने दोन वेळा पलटी घेतली. मात्र, चालक आणि प्रवाशांनी सीट बेल्ट लावलेला असल्याने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही, केवळ किरकोळ जखमांवर निभावले.
लातूर जिल्हा पोलिसांचे आवाहन: या घटनेच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. “सीट बेल्ट आणि हेल्मेट हे केवळ दंड टाळण्यासाठी नसून ते जीवनरक्षक आहेत,” असे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेले महत्त्वाचे सुरक्षा नियम: चारचाकी वाहनांसाठी: चालक आणि मागील सीटवर बसणाऱ्या सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट वापरणे बंधनकारक आहे. वेगमर्यादेचे पालन करून सुरक्षित अंतर राखावे.
- दुचाकी वाहनांसाठी: चालक आणि मागे बसणाऱ्या प्रवाशानेही ISI प्रमाणित हेल्मेट वापरणे अनिवार्य आहे.
“सीट बेल्ट लावा – जीव वाचवा” आणि “हेल्मेट वापरा – सुरक्षित राहा” हा संदेश या अपघाताच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

