LTN वेब न्यूज: कासार शिरशी पोलिसांची मोठी कारवाई; सशस्त्र दरोड्याचा थरार, पाठलाग करून एकाला ठोकल्या बेड्या!LTN वेब न्यूज: कासार शिरशी पोलिसांची मोठी कारवाई; सशस्त्र दरोड्याचा थरार, पाठलाग करून एकाला ठोकल्या बेड्या!

लातूर (प्रतिनिधी): निलंगा तालुक्यातील कासार शिरशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तांबाळा येथील ब्रिक यार्ड स्पोर्ट क्लबवर पडलेल्या सशस्त्र दरोड्याचा छडा लावण्यात पोलिसांना अवघ्या काही तासांत यश आले आहे. पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करत एका आरोपीला जेरबंद केले असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि मुद्देमाल जप्त केला आहे.

​३० मार्च २०२६ रोजी रात्री ९:३० च्या सुमारास तांबाळा येथील ब्रिक यार्ड स्पोर्ट क्लबमध्ये पाच अज्ञात इसमांनी घुसखोरी केली. आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून क्लबमध्ये मोठी दहशत निर्माण केली आणि रोख रकमेसह मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेत पोबारा केला. याप्रकरणी कासार शिरशी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१०(२), ३११ आणि शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांची ‘सुपरफास्ट’ कारवाई

​घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कासार शिरशीचे प्रभारी अधिकारी प्रवीण राठोड यांनी चक्रा फिरवली. तात्काळ औराद शहाजनी, किल्लारी, निलंगा, औसा, उमरगा आणि अगदी कर्नाटक राज्यातील बसवकल्याण पोलिसांशी संपर्क साधून नाकाबंदी करण्याचे आदेश दिले.

मध्यरात्री थरारक पाठलाग

​दरोडेखोर विनानंबरच्या ‘इनोव्हा’ गाडीतून शिराढोणच्या दिशेने पळत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पाठलाग सुरू केला. ३१ मार्चच्या मध्यरात्री १२:०० च्या सुमारास शिराढोण पाटी येथील नाकाबंदी पॉईंटवर संशयित वाहन अडवण्यात आले. अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना, पोलिसांनी कार्तिक कलाप्पा भोकले (वय २७, रा. भूसनी वाडी, ता. उमरगा) याला शिताफीने ताब्यात घेतले.

पथके रवाना, इतर आरोपींचा शोध सुरू

​ताब्यात घेतलेल्या आरोपीने आपल्या इतर चार साथीदारांसह हा दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे. फरार असलेल्या चार आरोपींच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि कासार शिरशी पोलिसांची चार विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

​ही धडाकेबाज कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, प्रताप गर्जे, उपनिरीक्षक अजय पाटील आणि त्यांच्या पथकाने बजावली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!