उदगीर LTN वेब न्यूज (प्रतिनिधी): गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि अटकेची कारवाई टाळण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह एका पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराचे मेव्हणे रणजित मल्हारी पाटील यांच्याविरुद्ध ३१ मार्च २०२६ रोजी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. (BNSS) च्या कलम ७६, ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी आणि अटक न करण्यासाठी पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी आणि पोलीस हवालदार राहुल बाबूराव नागरगोजे यांनी तक्रारदाराकडे ३,००,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
एसीबीचा सापळा आणि कारवाई
लाचेच्या मागणीबाबत तक्रारदाराने १ एप्रिल रोजी लातूर एसीबीकडे धाव घेतली. २ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान, पोलीस निरीक्षक पुजारी यांच्या सांगण्यावरून हवालदार नागरगोजे यांनी ५०,००० रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीअंती ४५,००० रुपये स्वीकारण्याचे ठरले.
अहमदपूर रोडवरील हॉटेल पंचवटी येथे एसीबीने सापळा रचला. यावेळी हवालदार नागरगोजे याने तक्रारदाराकडून ४५,००० रुपये स्वीकारले. लाच स्वीकारल्यानंतर नागरगोजे याने पोलीस निरीक्षक पुजारी यांना फोन करून तक्रारदार “भेटल्याची” माहिती दिली. त्यानंतर तक्रारदाराने पुजारी यांच्याशी फोनवर संवाद साधला असता त्यांनी “पाठवून द्या ना मला, मदत करता येईल” असे म्हणून लाच स्वीकारल्याची पुष्टी केली.
मुद्देमाल जप्त आणि पुढील तपास
एसीबीने आरोपींच्या अंगझडतीतून लाचेची ४५,००० रुपयांची रक्कम आणि मोबाईल हँडसेट जप्त केले आहेत. सध्या दोन्ही आरोपींच्या घरांची झडती घेण्याचे काम सुरू असून, त्यांच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कारवाई करणारे पथक:
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूरचे पोलीस उपअधीक्षक संतोष बर्गे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


