लातूर: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; महिलेकडून ५६ हजारांचा गांजा जप्त
लातूर (प्रतिनिधी) : अवैध अमली पदार्थांच्या विक्रीविरुद्ध लातूर पोलिसांनी कठोर पाऊल उचलले असून, स्थानिक गुन्हे शाखेने हरंगुळ येथील माउलीनगर भागात छापा टाकून एका महिलेला अटक केली आहे. तिच्याकडून २ किलो ८३० ग्रॅम वजनाचा, अंदाजे ५६ हजार ६०० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने मनिषा बालाजी चव्हाण (वय ३०) हिच्या घराची झडती घेतली असता, लोखंडी कपाटात हा मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अवैध धंद्यांविरुद्धची ही मोहीम यापुढेही सुरूच राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

