कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न हवे – सुनील खमितकर

सेवा पंधरवडा – विशेष शाळेतील शिक्षक, वाचा उपचार तज्ञ यांची कार्यशाळा..
लातूर दि ०१ ऑक्टोबर अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करीत विशेष शिक्षकांनी शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे जेणेकरून कर्णबधिर मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल असे प्रतिपादन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांनी येथे केले. समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर व ॲड. विजयगोपाल अग्रवाल मूकबधिर विद्यालय लातूर यांच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव निमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत विशेष शिक्षक, वाचा उपचार तज्ञ व पालकांची कार्यशाळा एमआयडीसी येथील मूकबधिर विद्यालयात घेण्यात आली.
यावेळी झालेल्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले मुंबई पुण्यासारख्या शिक्षण पद्धतीचा अवलंब करीत विशेष लातूरच्या कर्णबधिर विद्यार्थ्यांनाही शिक्षण देणे गरजेचे आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विशेष शिक्षकांनी कर्णबधिर मुलांच्या शिक्षणाचा पाया अधिक भक्कम करावा असेही ते म्हणाले .
तत्पूर्वी या कार्यशाळेचे उद्घाटन जीवन विकास प्रतिष्ठानचे संचालक संजय नीलेगावंकर यांच्या हस्ते झाले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सदस्य अभय शहा, संस्थेचे समन्वयक पी व्ही कुलकर्णी, समाज कल्याण विभागाचे अधीक्षक राम वंगाटे, दिव्यांग विभागाचे राजू गायकवाड, समाज कल्याण निरीक्षक दत्तात्रय कुंभार, सहाय्यक सल्लागार बाळासाहेब वाकडे,मुख्याध्यापक गौतम जोगदंड, शिवप्रसाद भंडारे, जयश्री कुलकर्णी,राजेश शर्मा यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम सांकेतिक भाषेच्या प्रणेत्या हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यासह मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक करताना संचालक संजय निलेगावंकर यांनी कर्णबधिर मुलांच्या जीवनात सांकेतिक भाषेचे महत्व पटवून दिले. कर्णबधिर मुलांच्या जीवनात सांकेतिक भाषा किती महत्त्वाची आहे याचे उदाहरण ही त्यांनी दिले. कार्यशाळा दोन सत्रात घेण्यात आली. पहिल्या सत्रात वाचा उपचार तज्ञ रतन जाधव यांनी लवकरात लवकर निदान व हस्तक्षेपण म्हणजे काय व त्याचे फायदे विशद केले. श्रवण चाचण्यांच्या विविध पद्धती याच्याबाबतही त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात विशेष शिक्षणातील तज्ञ हनुमंत बाशिंगे यांनी कर्णबधीरांच्या समावेशनात सांकेतिक भाषेचे महत्व व जनजागृती पटवून दिली. यासह नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून विशेष शिक्षण अध्यापन प्रणालीची माहिती ही कशी सोपी करता येईल हे पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन चेतन सोमवंशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड. विजयगोपाल अग्रवाल मूकबधिर विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
११० शिक्षकांचा सहभाग..
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव सेवा पंधरवाडा तसेच जागतिक सांकेतिक भाषा दिन व जागतिक कर्णबधिर दिन या निमित्त ही कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेत जिल्ह्यातील कर्णबधिर शाळेतील ११० विशेष शिक्षक व वाचा उपचार तज्ञ यांनी सहभाग नोंदवला होता . यासाठी लातूरच्या समाज कल्याण विभागाने पुढाकार घेतला होता.

सेवा पंधरवडा - विशेष शाळेतील शिक्षक, वाचा उपचार तज्ञ यांची कार्यशाळा..