मिडलैंड लंगर सेवा सोसायटीचे विशेष सहकार्य लाभले.
नांदेड दि ०१ नोव्हेंबर यू. के. (इंग्लैंड) येथे कार्यरत मिडलैंड लंगर सेवा सोसायटी, ऑस्ट्रलियन स्पोर्ट्स अकादमी आणि गुरुद्वारा तखत सचखंड बोर्ड यांच्या संयुक्त माध्यमाने राजस्थान येथील १८० सिख, सिखलीगर यांना गुरुद्वारा तखत सचखंड हजूर साहेब येथे सिख धर्माच्या अमृतपानाची सामूहिक दिक्षा देण्यात आली. गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी आणि पंजप्यारे साहिबान यांच्या मार्गदर्शनात सोमवार, दि ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता गुरुद्वारात भव्य अमृतसंचार कार्यक्रम पार पडले. अमृतसंचार दीक्षा कार्यक्रमात लहान मुलांपासून ९६ वर्षे वयातील वृद्धानी देखील सहभागी होऊन दीक्षा घेतली.

यावेळी मिडलैंड लंगर सेवा सोसायटीचे प्रमुख भाईसाहब स. रणधीरसिंघ यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अमृतपान कार्यक्रम आयोजनात ज्ञानी तेगासिंघजी यांनी देखील महत्वाची भूमिका पार पाडली. या कार्यक्रमासाठी इंग्लैंड येथून माता बलविंदरकौरजी, मिडलैंड लंगर सेवा सोसायटी तर्फे सेवारत भारतात प्रमुख स. तेजिंदरसिंघ, स. हरविंदरसिंघ, स. अनहदसिंघ, बलज्योतकौर, प्रितपालसिंघ, हरप्रीतसिंघ, वरियामसिंघ, सिकंदरसिंघ यांनी सहभागी होऊन आपल्या सेवा समर्पित केल्या. मिडलैंड लंगर सेवा सोसायटीच्या वतीने संतबाबा कुलवंतसिंघजी, पंजप्यारे साहिबान, गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ परविंदरसिंघ पसरीचा, गुरुद्वारा बोर्ड प्रभारी अधीक्षक स. ठानसिंघ बुंगाई व गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाचे आभार मानण्यात आले. विशेष बाब म्हणजे आज मिन्दोकौर नावाच्या ९६ वर्षे वृद्ध महिलेने अमृताची दीक्षा आत्मसात केली. शिवाय ५० ते ६० संख्येत महिलांनी आणि लहान मुलांनी अमृतपान करून पंचककार धारण केले असुन या कार्याबद्दल सर्वञ प्रशंसा होत आहे.
