तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी ईशारी गणेश
महासचिवपदी आर डी मंगुयेशकर तर महाराष्ट्राचे मिलिंद पठारे सहसचिव !
पुणे दि १७ नोव्हेंबर तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय महासंघाची निवडणूक पार पडली असून अध्यक्षपदी ईशारी गणेश, महासचिवपदी आर डी मंगुयेशकर व कोषाध्यक्षपदी जसबीर गील यांची तर महाराष्ट्रातील मिलिंद पठारे यांची सहसचिव पदी निवड झाली आहे.
तायक्वांदो खेळांमध्ये २०१७ पासून निर्माण झालेली अस्थिरता व ५ वर्षांच्या न्यायालयीन लढाई नंतर दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार भारतीय ऑलिंपिक असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली या राष्ट्रीय खेळ संघटनेची निवडणूक १४ नोव्हेंबर २०२२ रोजी नवी दिल्ली येथील ऑलिंपिक भवन येथे पार पडली. या निवडणुकीमध्ये मंगुयेशकर विरुद्ध शर्मा अशी निवडणूक लढली गेली. ॲड.आर डी मंगुयेशकर पॅनल मधील सर्व १८ उमेदवार बहुमताने निवडून आले आहेत. गणेश ईशारी ( तामिळनाडू) यांनी संजय शिरपूरीया ( गुजरात) यांना ३८ विरुद्ध ३० अशा मतांनी पराभूत केले तर महासचिव पदी विराजमान झालेल्या ॲड. आर डी मंगुयेशकर ( गोवा ) यांनी ४१ विरुद्ध २७ मतांनी प्रभात शर्मा ( झारखंड) यांचा पराभव केला. कोषाध्यक्ष जसबीर सींग गील (हरियाणा) यांनी अतुल पंगोत्रा ( जम्मू-काश्मीर ) यांना ३८ विरुद्ध २९ मतांनी पराभूत केले. उपाध्यक्षपदाच्या ५ जागांवर संतोष कुमार मोहंती (ओडीसा) हिरण्य सयीका (आसाम) ,एल सोकून सिंग (अरुणाचल प्रदेश), शैलेंद्र श्रीवास्तव (मध्य प्रदेश) व हर्षवर्धन प्रसाद (आंध्र प्रदेश) यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. सहसचिव पदासाठी मिलिंद पठारे (महाराष्ट्र), अनिल द्वीवेदी (छत्तीसगड) व सतीश गौड (तेलंगणा) यांची निवड झाली आहे.
राजकुमार (उत्तर प्रदेश), पी. स्टेलीन ( पुंडीचरी ) , सी दोराई (कर्नाटका), राजेश यादव (मध्य प्रदेश), अजि बी. ( केरळा), शशिबाला बधानी (बिहार) आणि विक्रम सिंग (छत्तीसगड) यांची कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने नियुक्त केलेले निवृत्त न्यायाधीश जी एस सिस्तानी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून तर खो- खो फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव एम एस त्यागी यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे निरीक्षक म्हणून काम पाहिले. जी एस सस्तानी यांनी निवडून आलेल्या सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा करून हा निवडणूक अहवाल भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन कडे दाखल केला व निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना तायक्वांदो खेळाच्या विकासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.