Rupali chakankar

महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केले लातूर जिल्ह्यातील महिलाविषयक कामांचे कौतुक !

• प्रशासनाच्या उत्तम कामगिरीमुळे महिला विषयक तक्रारी कमी

• महिलांमधील कर्करोग निदानासाठी राबविलेली मोहीम कौतुकास्पद

• ‘आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत महिलाविषयक योजनांचा आढावा

लातूर दि.1 (जिमाका) : जिल्ह्यात महिलांसाठीचे कायदे, योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत लातूर जिल्ह्यातून महिलांवरील अत्याचार, अन्याय याच्या सर्वात कमी तक्रारी येतात. त्यामुळे लातूरमध्ये इतर जिल्ह्याच्या तुलनेत उत्तम काम होत आहे. तसेच महिलांमधील कर्करोग निदानासाठी आरोग्य विभागाने जिल्हा स्तरावर राबविलेली विशेष मोहीम कौतुकास्पद असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

स्त्रियांच्या हक्काचे संरक्षण व्हावे, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांना आळा बसावा, यासाठी राज्य महिला आयोगाने ‘आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनमध्ये आयोजित आढावा बैठकीत श्रीमती चाकणकर बोलत होत्या.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी देवदत्त गिरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्याचे लवकर निदान होण्यासाठी लातूर जिल्ह्य परिषदेने ‘संजीवनी अभियान’ राबवून 30 वर्षांवरील तीन लाख 42 हजार महिलांची तपासणी केली असून त्यापैकी तीन हजार 900 महिलांची बायोप्सी चाचणी करण्यात येणार आहे. हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असल्याचे श्रीमती चाकणकर म्हणाल्या.

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी सर्व शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये लैंगिक छळ तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. खासगी कार्यालयांमध्ये या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याची दक्षता कामगार विभागाने घ्यावी, अशा सूचना श्रीमती चाकणकर यांनी दिल्या. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस आणि खासगी कार्यालयांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र व चांगली प्रसाधनगृहे उभारावीत. दामिनी पथकाने गस्तीचे प्रमाण वाढवावे, तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये जावून महिला विषयक कायदे, तसेच तक्रार कोठे करावी, याबाबत मार्गदर्शन करावे, असे त्यांनी सांगितले.

‘सोशल मिडिया वॉचर’ उपक्रम राज्यभर राबविण्याच्या सूचना करणार

पोलीस विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘सोशल मिडिया वॉचर’ उपक्रमाचेही त्यांनी यावेळी कौतुक केले. बदनामीकारक छायाचित्रे, लेखन यामुळे होणारी महिलांची बदनामी टाळण्यासाठी या उपक्रमांतर्गत पोलिसांकडून समाज माध्यमांवर लक्ष ठेवले जाते. तसेच आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध स्वतःहून कारवाई केली जाते. लातूर जिल्ह्यातील हा उपक्रम राज्यात इतरही जिल्ह्यांमध्ये राबविण्याची सूचना करणार असल्याचे श्रीमती चाकणकर यांनी यावेळी सांगितले.

महापालिकेचा महिलांसाठी मोफत बससेवेचा उपक्रम स्तुत्य.

लातूर महानगरपालिकेने महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली असून आतापर्यंत 22 लाख महिलांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थिनी, महिला कामगार यांना दिलासा मिळाला असून हा उपक्रम स्तुत्य असल्याचे श्रीमती चाकणकर यावेळी म्हणाल्या. यावेळी त्यांनी विविध विभागांमार्फत महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला.

You cannot copy content of this page

error: Content is protected !!