पाच वर्षाखालील मुलांना गोवर रुबेला आजार लसीकरणाने टाळता येतो !

मुंबई, ठाणे, भिवंडी, वसई विरारसारख्या मोठ्या शहरात आजाराचे प्रमाण सर्वाधिक.

सध्या राज्यात गोवर आजाराचे रुग्ण आढळून येत असून मुंबई, ठाणे, भिवंडी, वसई विरारसारख्या मोठ्या शहरात या आजाराचे प्रमाण अधिक आहे. मागील अनेक वर्षातील सर्वाधिक रुग्णसंख्या चालू वर्षी आढळून आली आहे. लसीकरणामुळे गोवर आजार टाळता येतो. त्यामुळे लातूर जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढू नये, यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात आरोग्य यंत्रणेमार्फत सर्वेक्षण व लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

लसीकरणामुळे टाळता येणाऱ्या गोवर, रुबेलासारख्या सर्व आजारांचे नियमीत सर्वेक्षण व लसीकरण करुन यावर प्रतिबंध केला जाऊ शकतो. शासनाने पुढील वर्षीच्या डिसेंबर अखेरपर्यंत गोवर रुबेला निर्मुलनाचे उद्दिष्ट आखून दिले आहे. यासाठी लसीकरणाचे प्रमाण किमान 95 टक्के असणे, गोवर रुबेला आजाराचे सर्वेक्षण सक्षमपणे करणे, आणि गोवरच्य पहिल्या मात्रेनंतर दुसऱ्या मात्रेतील गळतीचे प्रमाण शून्य करणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात लसीकरणाचे नोव्हेंबरपर्यंतचे उद्दिष्ट पूर्ण

लातूर जिल्ह्यात नोव्हेंबर अखेरपर्यंत वार्षिक उद्दिष्टाच्या 58 टक्के लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित होते. जिल्ह्यात आतापर्यंत 60 टक्के मुलांना पहिली मात्रा आणि 58 टक्के मुलांना देण्यात आली आहे. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात गोवर रुबेला लसीकरणापासून वंचित राहिलेल्या मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 15 ते 25 डिसेंबर आणि 15 ते 25 जानेवारी दरम्यान लसीकरणापासून वंचित असलेल्या सर्व बालकांना विशेष मोहीमेद्वारे गोवर लसीकरण करण्यात येणार आहे.

अशी आहेत गोवर आजाराची लक्षणे

गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार मुख्यत्वे पाच वर्षाखालील मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळ्यांची जळजळ, सुरुवातीला चेहऱ्यावर आणि नंतर उर्वरीत शरीरावर लाल, सपाट पुरळ ही गोवर आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. गोवरमुळे काही मुलांमध्ये अतिसार, कर्ण संसर्ग, न्यूमोनिया, क्वचित फेफरे, अंधत्व किंवा मेंदू संसर्ग अशी गुंतागुंत होऊ शकते व मृत्यूचा धोकाही वाढतो.

गृहभेटीद्वारे सर्वेक्षण आणि रक्तजल नमुने संकलन

सध्या जिल्ह्यात गृहभेटीद्वारे सर्वेक्षण सुरु असून ताप व पुरळ असलेल्या व्यक्तींचे रक्तजल नमुने घेण्यात येत आहेत. त्यांची तपासणी मुंबई येथील हाफकीन प्रयोगशाळेत करण्यात येते. रक्तजल नमुना दुषित आढळून आल्यास सदर रुग्णास ‘जीवनसत्व अ’ची पूरक मात्रा आणि लक्षणांनुसार औषधोपचार देण्यात येतात. आजपर्यंत 122 व्यक्तींचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून सद्यस्थितीत एकही नमुना पॉझिटिव्ह आलेला नाही. संभाव्य साथीचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व खासगी व्यावसायिक, विशेषतः बालरोग तज्ञ, वैद्यकीय महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी वरील लक्षणे असलेल्या रुग्णांची वेगळी नोंदणी करून त्याचा अहवाल जिल्हास्तरावर संकलित करण्यात येत आहे.

जिल्हा टास्क फोर्सकडून आढावा

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखाली गोवर साथीच्या संदर्भात 1 डिसेंबर 2022 रोजी जिल्हा टास्क फोर्स समीतीची बैठक झाली. यावेळी महानगरपालिका आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सक, सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

लसीकरण आणि सर्वेक्षणासाठी हवे नागरिकांचे सहकार्य

नागरिकांनी पाच वर्षांखालील बालकांचे गोवर रुबेला लसीकरण करून घ्यावे, तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी सर्वेक्षणासाठी घरी आल्यानंतर त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले. तसेच नगरविकास विभाग, महिला आणि बालकल्याण विभाग, ग्रामविकास विभाग, अल्पसंख्याक कल्याण विभाग, शालेय शिक्षण विभाग यांनी आरोग्य यंत्रणेशी समन्वय ठेऊन गोवर संसर्ग रोखण्यासाठी काम करण्याच्या सूचना दिल्या.

You cannot copy content of this page

error: Content is protected !!