बीड येथे तायक्वांदो खेळाडूंना पदके, बेल्ट व प्रमाणपत्र देऊन सन्मान !!

बीड प्रतिनिधी – तायक्वांदो असोसिएशन ऑफ बीड यांच्या मान्यतेने चॅम्पियन्स तायक्वांदो अकॅडमी अंतर्गत घेण्यात आलेल्या कलर बेल्ट परीक्षेतील उत्तीर्ण खेघळाडूंना तसेच चंपावती चषक तायक्वांदो स्पर्धेतील पदक विजेत्यांना बेल्ट , प्रमाणपत्र व पदकं देऊन सन्मानित करण्यात आले, अशी माहिती बीड जिल्हा तायक्वांदो संघटनेचे प्रमुख राष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. अविनाश बारगजे यांनी दिली.

तायक्वांदो खेळातील नवोदित खेळाडू त्यांच्या अभ्यासक्रमाच्या आधारावर जागतिक संघटनेच्या नियमानुसार “कलर बेल्ट” परीक्षेचे आयोजन करण्यात येते. तायक्वांदो खेळातील आपले ज्ञान अद्यावत करत हे विगद्यार्थी त्यांच्या सरावानुसार पांढरा बेल्ट पासून हळूहळू गडद होत जाणाऱ्या रंगाकडे मार्गस्थ होण्याची प्रक्रिया म्हणजे “कलर बेल्ट ग्रेडेशन”. अशा या कलर बेल्ट परीक्षेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना व्हाईट, यलो, ग्रीन, ब्लू , रेड रंगाच्या बेल्ट साठी प्रात्यक्षिक परीक्षेचे आयोजन बीड जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या वतीने नुकतेच करण्यात आले होते. या कलर बेल्ट परीक्षेसह चंपावती चषक तायक्वांदो स्पर्धेतील सुवर्णपदक व रौप्यपदक विजेत्यांना यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके साहेब, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख मॅडम, सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य डाके एस ए, डॉ. अविनाश बारगजे व जया बारगजे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून डॉ. अविनाश बारगजे यांनी पाहुण्यांना या उपक्रम व स्पर्धा बद्दल माहिती दिली. याप्रसंगी बोलताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वासुदेव सोळुंके साहेब यांनी खेळाडूंना प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, अभ्यास व खेळाची सांगड घालून समतोल साधल्यास जीवनामध्ये यशस्वी होता येते. त्यामुळे जिंकण्या हरण्याची सवय लागून शारीरिक क्षमते सोबतच मानसिक स्वास्थ चांगले राहते व आत्मविश्वास ही वाढतो. खेळामुळे जीवनात यशस्वी होता येते, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
