लातूर जिल्ह्यात झाले २ लाख ४२ हजार जनावरांचे लंपी प्रतिबंधात्मक लसीकरण.
लातूर, दि ०६ नोव्हेंबर राज्यात लंपी चर्मरोगाचा जनावरांमध्ये होत असलेला प्रसार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार लातूर जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाने युद्धपातळीवर मोहीम राबवून ०२ लाख ४२ हजार जनावरांचे लसीकरण केले आहे. उर्वरित जनावरांच्या लसीकरणासाठी दि २८ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली.

लसीकरण झालेल्या पशुधनातही लंपी आजाराची लक्षणे दिसून आली असली तरी ही जनावरे गंभीर होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित सर्व जनावरांचे लसीकरण करण्यासाठी २८ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. त्यामध्ये सर्व गाई आणि वासरे यांचे लसीकरण करण्यात आले आहे. ज्या पशुधनाचे लसीकरण झालेले नाही, अशा पशुधन मालकांनी त्यांच्या नोंदी ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करून दिलेल्या नोंदवहीत किंवा जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात करावयाच्या असून त्यानुसार संबंधित गावांमध्ये लसीकरण उपलब्ध केले जाणार आहे.
लातूर जिल्ह्यात २८ ऑगस्टपासून लंपी रोगाची साथ सुरू झाली असून जळकोट तालुका वगळता इतर सर्व तालुक्यातील १६० गावांमध्ये ही साथ पसरली. जिल्ह्यात बाधित झालेल्या एकूण एक हजार ७४७ बाधित पशुधनापैकी एक हजार १३७ जनावरे उपचारानंतर बरे झाली, तर ५९ जनावरे मृत्युमुखी पडली. यापैकी ३२ पशुधन मालकांना आठ लाख १६ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली असून उर्वरित पशुधनाची नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही सुरु आहे.
