अपघाती मृत्यू टाळण्यासाठी सरसावले लातूर आरटीओ.
विना परवाना व बेशिस्त वाहन चालकांची आता खैर नाही.
लातूर दि २१ नोव्हेंबर जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान २५७ नागरिकांचे मृत्यू रस्ते अपघातात झालेले आहेत. त्यात सर्वाधिक मृत्यू हे लातूर शहर व परिसरातील आहेत. त्यामुळे वाहतूक सुरक्षेचे नियमांचे सर्वांनी पालन करावे. सीट बेल्ट, हेल्मेट, वाहन चालवताना वेगमर्यादा व मोबाईलवर न बोलणे याचे काटेकोर पालन केल्यास रस्ते अपघातातील होणारे मृत्यू टळतील, आम्ही याबाबत शाळा, महाविद्यालयात जागृती करणार आहोतच, शिवाय विनापरवाना वाहन व बेशिस्त वाहनधारकावर कडक कारवाई करणार आहोत, त्यामुळे सगळ्यांनी वाहतुकीचे नियमांचे पालन करावे, असे आवाहन लातूरचे आरटीओ विजय भोये यांनी आज २० नोव्हेम्बर रोजी येथे केले, रस्ते अपघातात जगभरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली म्हणून २१ नोव्हेंबर हा दिवस जागतिक स्मरण दिन म्हणून जगभर पाळला जातो. त्या निमित्ताने माझं लातूर परिवार आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अशोक हॉटेल या ठिकाणी रस्ते सुरक्षा, अपघात विषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरटीओ भोये बोलत होते. विना लायसन्स किंवा वाहनाची कागदपत्रे नसणार्यांवर, शिवाय सीट बेल्ट, हेल्मेटचा वापर न करणार्यांवर व वेगमर्यादा न पाळणार्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. असेही त्यांनी सांगितले.
या शिबिरात उपपरिवहन अधिकारी आशुतोष बारकुल, प्रादेशिक परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक शितल गोसावी, डॉ. आनंद कलमे, मनोज लोणारी, शहर वाहतूक पोलिस उपनिरीक्षक आवेज काझी, आयुब शेख यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांनी रस्ता सुरक्षेबद्दल यावेळी मार्गदर्शन केले. शिबिराचे सूत्रसंचलन सहा. मोटार वाहन निरीक्षक अर्जून मेलागिरी यांनी केले तर आभार माझं लातूर परिवाराचे सोमनाथ मेटगे यांनी मानले.