४ फेब्रुवारी डॉ.मामासाहेब जगदाळे जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
कोण होते मामा!
निवृत्ती गोविंदराव जगदाळे उर्फ कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे (फेब्रुवारी ४, इ.स. १९०३ – मे ३०, इ.स. १९८१) हे महाराष्ट्रातील एक शिक्षणप्रसारक आणि समाजसुधारक होते. कर्मवीर भाऊराव पाटील[१], शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे[२], पंजाबराव देशमुख यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात बहुजनांच्या शिक्षणासाठी प्रसार व्हावा यासाठी संस्था निर्माण केल्या होत्या. यांचे बरोबरीनेच कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. मामांचा उल्लेख बहुजनांच्या शिक्षणाचे कैवारी म्हणून केला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर व मराठवाड्यातील उस्मानाबाद या सीमावर्ती भागात बहुजन मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून बार्शी येथे ‘श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ ’ स्थापन करून शिक्षणप्रसार केला. संस्थेची बोर्डिंगे, प्राथमिक शाळा (५), माध्यमिक शाळा (१४), उच्च माध्यमिक (१४ ),द्विलक्षी व किमान कौशल्य अभ्यासक्रम (५ ठिकाणी), महाविद्यालये (५ ), कृषितंत्रनिकेतने (२), नर्सिंग महाविद्यालय५, दवाखाना, शेती, धेनुसंवर्धन, तांत्रिक शिक्षण, छापखाना यांचे मूर्तस्वरूप आज सन २०१८मध्ये लक्षात येते. हे पथदर्शक दिशा देण्याचे द्रष्टेपण मामांच्या विचारात व कृतीत होते. गरीब व होतकरू मुलांना मोफत शिक्षण दिले पाहिजे, पैशावाचून बहुजनांच्या मुलांचे शिक्षण थांबले नाही पाहिजे यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. त्यामागे उदात्त ध्येयवाद, त्याग व सेवा तसेच कामाची तळमळ व निष्ठा या गोष्टी होत्या. काम करून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक रोजगार देत जेणेकरून त्या विद्यार्थ्याला आणि संस्थेला मदत होईल.
चरित्र
मामासाहेब जगदाळे यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील भिकार सारोळे (ता. वाशी) या गावी वारकरी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ गाव चारे (बार्शी)[६] हे सोलापूर जिल्ह्यातील आहे. या गावाचा शेती[७] हा प्रमुख व्यवसाय. जगदाळे कुटुंबाने शेती करत असताना वारकरी संप्रदायाची पताका हाती घेतली. संपूर्ण कुटुंब भक्तिमय झाले. वडील गोविंदराव व आई मुक्ताबाई यांच्याकडून मामांना संस्काराची शिदोरी मिळाली. बालपण चारे गावात गेले. खरे तर मामा हे वयाच्या दहाव्या वर्षी शाळेत गेले. चारे गावात तिसरीपर्यंत शिक्षण घेण्याची सोय होती. पुढील शिक्षणासाठी कुटुंबाचा विरोध पत्करून बार्शी येथे शिक्षण घेतले. मामा सातवीची परीक्षा १९२३ साली व इंग्रजी माध्यमातून मॅट्रिकची परीक्षा १९३० साली उत्तीर्ण झाले. १९३१ मध्ये मामांनी ‘ सोलापूर को- ऑपरेटिव्ह सुपरवायझिंग युनियन’चे सुपरवायझर म्हणून काम केले. परिस्थितीमुळे आपणास उच्च शिक्षण घेता आले नाही हे ओळखून बहुजन समाजातील मुले शिकली पाहिजेत. यासाठी मामांनी १९३४ मध्ये बार्शी येथे श्री शिवाजी बोर्डिंगची स्थापना केली. सुभद्रा अक्का यांना विनंती करून आपल्या दोन भाच्यांना बोर्डिंग मध्ये ठेवून सुरुवात केली. बोर्डिंगसाठी मामा गावोगावी जाऊन धान्य मागत असत. सुरुवातीला बोर्डिंगसाठी जागा नव्हती. १९४३ साली शिवाजी बोर्डिंगच्या इमारतीचे काम पूर्ण झाले. आज त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. मामांच्या जीवनावर छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा प्रभाव होता. श्रमाची प्रतिष्ठा ओळखून मामांनी ‘कमवा व शिका’सारखी योजना प्रत्यक्ष राबवली.
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ
संस्थेचे नाव श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी आहे. संस्थेचे मुख्य कार्यालय बार्शी येथे आहे. संस्थेचे ध्येय आणि उद्दिष्ट यांना अनुसरून व्यस्थापन समितीचे प्रशासन कार्यान्वित आहे.
मामासाहेब जगदाळे यांना मराठवाडा विद्यापीठाने २४ फेब्रुवारी १९८० रोजी ‘डी.लिट’ पदवी तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी देऊन गौरव करण्यात आला आहे.
मामांना विनम्र अभिवादन..!