केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या मान्यतेने नांदेड येथे राज्यस्तर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन.
सुवर्णपदक विजेते दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार.
नांदेड क्रीडा प्रतिनिधी : भारत सरकारच्या युवा व खेळ मंत्रालयाच्या मान्यतेने नॅशनल स्पोर्ट्स फाउंडेशनच्या अंतर्गत नांदेड येथे शालेय स्पर्धेच्या धर्तीवर राज्यस्तर तायक्वांद स्पर्धेचे आयोजन ७ ते ९ एप्रिल २०२३ दरम्यान श्री गुरुगोविंद सिंघजी स्टेडियम इंडोर हॉल जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड येथे करण्यात आले असून या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते दिल्ली राजघाट येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहेत.
भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने सीबीएससी , केंद्रीय विद्यालय , नवोदय विद्यालय , ए आय यु ( इंडिया इंटर युनिव्हर्सिटी) शालेय खेळ महासंघ तसेच देशात अधिकृतपणे चालणाऱ्या खेळ महासंघात मान्यता दिलेल्या यादीत स्टेअर्स फाउंडेशन चा समावेश करण्यात आला असून 43 विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन यात होणार आहे. नांदेड येथील मास्टर बालाजी पाटील जोगदंड यांना तायक्वांदो खेळाचे राज्य प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यांच्या अंतर्गत दिनांक 07 ते 09 एप्रिल 2023 दरम्यान आयोजित राज्य स्पर्धेत सब ज्युनिअर, केडेट, ज्युनिअर व सीनियर मुले मुलीच्या वयोगटात क्यरोगी व पुमसे प्रकारात विविध वजन गटात या स्पर्धा आयोजित होत आहेत यात राज्याच्या विविध २७ जिल्ह्यातून संघ सहभागी होणार असल्याची माहिती राज्य प्रमुख बालाजी जोगदंड यांनी दिली आहे. स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणून दिल्ली येथून मास्टर पारस मिश्रा यांची उपस्थिती राहणार असून विजेत्या खेळाडूंना सुवर्ण रौप्य व कांस्य पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे .