डाॅ बाबासाहेब जयंतीनिमित्त आदर्श शिंदेंच्या गायनाने उदगीरकरांमध्ये नवऊर्जा.
खासदार सुधाकर शृंगारे यांचे अभूतपूर्व जल्लोषात स्वागत.
हजारोंच्या संख्येने उदगीरकरांची उपस्थिती.
उदगीर : प्रतिनिधी शेतकरी कामगार दिनदुबळा तुझ्याच पाठी,महिलांना आवाज दिला सोडवून रुढीच्या गाठी, नदी जोड प्रकल्प तुझा, पाण्याच्या नियोजनासाठी रुपयाच्या प्रश्नाचे सारे उत्तर तुझ्याच हाती, नव्या दिशेचा आधुनिक भारत, तोच आंबेडकरवाद, स्पंदनाची पुकारे साद… बाबासाहेब जिंदाबाद. बाबासाहेब जिंदाबाद..! अश्या स्फूर्ती जागवणा-या गीताने गायक आदर्श शिंदे यांनी आपल्या गायनाची सुरुवात केली. “बाबासाहेब जिंदाबाद ” या गीताला उदगीरकरानी अक्षरशः डोक्यावर घेतले. उदगीर येथे खासदार सुधाकर शृंगारे यांनी गायक आदर्श शिंदे यांच्या प्रबोधन संध्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहत उदगीरकरानी गर्दीचा नवीन उच्चांक स्थापित केला. या प्रबोधन संध्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला खासदार सुधाकर शृंगारे यांचे उदगीरकरांच्या वतीने क्रेनच्या सहाय्याने मोठा पुष्पहार घालून जल्लोषात स्वागत करण्यात आले. नवीन युवा कार्यकर्त्यांची गर्दी यावेळी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या सोबत दिसून आली.

गायक आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली होती. साऊंड सिस्टम, लाईट इफेक्ट्स, बॅरिगेट्स, आसन व्यवस्था आणि आदर्श शिंदेसह संचातील एका पेक्षा एक गायक-गायिकांचा सुमधुर आवाजातील बाबासाहेबांची प्रेरणा देणारी गीते, यामुळे वातावरण स्फूर्तीमय झाले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर या कार्यक्रमाच्या अध्यस्थानी खासदार सुधाकर शृंगारे हे होते. यावेळी माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, भाजपा तालुकाध्यक्ष बसवराज रोडगे, युवा नेते शंकर शृंगारे, शुभम शृंगारे, रिपाईचे देविदास कांबळे, माजी नगरसेवक गणेश गायकवाड, उदयसिंह ठाकूर, बालाजी गवारे, पप्पू गायकवाड , साधुराम कांबळे, यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते. उदगीरकरांच्या वतीने खासदार सुधाकर शृंगारे यांचे कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल यावेळी सत्कार करण्यात आला. तर गायक आदर्श शिंदे यांचा खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.

प्रख्यात गायक स्व.प्रल्हाद शिंदे यांच्या “पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, बोधीवृक्षाने कथन केले ते चारित्र्य गौतमाचे, “या गीताने प्रबोधन संध्येची सुरुवात करण्यात आली. त्या नंतर आलेल्या आदर्श शिंदे यांनी बाबासाहेबांची एका पेक्षा एक स्फूर्ती गिते सादर करून उदगीरकराना तीन तास बसून रहायला भाग पाडले. संगीत, श्रवणीय आवाज आणि बाबासाहेबांचे संघर्षमय जीवन, या संघर्षांतून कोटी कोटी नागरिकांना मिळालेले स्वाभिमानाचे जीवन या सर्वांचा सार या प्रबोधन संध्येत होता.

आदर्श शिंदे यांनी गायिलेल्या “सोनियाची उगवली सकाळ, जन्मास आले भिम बाळ, या गीताने जयंतीचा आनंद द्विगुणित केला. महिला मुलांची संख्या या कार्यक्रमाला मोठी होती.” जगात गाजावाजा भीमराव एकच राजा”. त्या नंतर “माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविले रमाने ” अशी अनेक सरस गीते या कार्यक्रमात सादर करण्यात आली. या कार्यक्रमाने उदगीर आणि जळकोट तालुक्यातील जयंतीच्या वातावरणात उत्साह निर्माण केला. खासदार सुधाकर शृंगारे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना, वक्त्या पेक्षा गायक बाबासाहेब मांडण्यात सरस ठरतात म्हणून आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे म्हंटले. या कार्यक्रमाची जय्यत तयारी, युवा नेते शंकर शृंगारे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.








