लातूरच्या जिल्हा रुग्णालयासाठी लागणारी जागा कृषी विभाग देणार.लातूरच्या जिल्हा रुग्णालयासाठी लागणारी जागा कृषी विभाग देणार.

लातूरच्या जिल्हा रुग्णालयासाठी लागणारी जागा कृषी विभाग देणार.

● येत्या 14 ऑगस्टला लातूर मध्ये सोयाबीन परिषद घेणार – कृषी मंत्री अब्दुल सत्तार
● लातूरच्या तेलबिया संशोधन केंद्राची 1 हजार एकर जमिनी तेल बि- बियाण्याच्या संशोधनासाठी
तयार
● लातूरच्या कृषी महाविद्यालयाला दोन वसतिगृह देणार

लातूर दि 02 मे लातूरच्या जिल्हा रुग्णालयाला लागणारी 10 एकर जमीन कृषी विभागाकडून वर्ग केली जाणार असल्याचे सांगून 14 ऑगस्टला कोविड मुळे होऊ न शकलेली सोयाबीन परिषद घेऊ अशी ग्वाही कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

कृषी महाविद्यालयाच्या अनुसूचित जातीच्या मुलीसाठी बांधण्यात आलेल्या वसतिगृहाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खा. हेमंत पाटील, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्र मणि, मा. आ. पाशा पटेल, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, कृषी अधिष्ठाता डॉ. धर्मराज गोखले यांच्यासह संशोधक, प्राध्यापक उपस्थित होते.

देशात सर्वाधिक सोयाबीन घेणाऱ्या जिल्ह्यात लातूरचा दुसरा क्रमांक लागतो त्याच बरोबर देशात तेल बिया संशोधनात इथल्या तेल बिया संशोधन केंद्राचे योगदान मोठे आहे. त्यामुळे इथल्या कृषी महाविद्यालयाचे महत्व अनन्य साधारण आहे, त्यामुळे या महाविद्यालयाला लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तात्काळ देण्यात येतील. आपल्या कृषी विद्यापीठाला 50 कोटी रुपये यावर्षी दिले असून आज अनुसूचित जातीच्या 100 मुलींसाठीचे वस्तीगृहाचे उदघाटन आपण केले. अजून एक मुलींचे आणि एक मुलांच्या वस्तीगृहाची गरज लक्षात घेऊन तेही मंजूर करण्यात येत असल्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

लातूर जिल्हा प्रशासनाची जिल्हा रुग्णालयासाठी लागणारी कृषी महाविद्यालयाची दहा एकर जमीनची मागणी प्रलंबित असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी आपल्याला सांगितले. इथल्या शेतकऱ्यांनी शेकडो एकर जमीन कृषी शिक्षण,संशोधनासाठी दिली आहे, त्यांच्या आरोग्यासाठी आपण दहा एकर जागा देऊ अशी घोषणा कृषी मंत्र्यांनी यावेळी केली. तसेच कोविड काळामुळे मधले दोन वर्षे जी सोयाबीन परिषद झाली नाही ती लातूर मध्ये 14 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती केली जाणार असल्याचेही यावेळी ते म्हणाले.

शेतकरी हा अत्यंत महत्वाचा घटक असल्यामुळे शासनाकडून आता शेतकऱ्यांचा फक्त 1 रुपया मध्ये विमा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्याच बरोबर पंतप्रधान किसान सन्मान योजनेत पूर्वी केंद्र सरकार कडून सहा हजार मिळत होते. त्यात आता राज्य शासन सहा हजार रुपये देणार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे मिळून आता वर्षांला 12 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांवर अवकाळीचे अस्मानी संकट कोसळले आहे. लातूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर काही शेतकऱ्यांच्या शेतात भेटी दिल्या, त्यातून अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची कल्पना आपल्याला आली. जिल्हा प्रशासनाने ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश दिले होते त्या प्रमाणे पंचनामे झाल्याचे सांगून शासन नियमाप्रमाणे मदत करणार असून अजूनही काही दिवस वातावरण असेच राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे सर्वानी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्र मणि यांनी येत्या काळात विद्यापीठ कृषी संशोधनावर भर देणार देणार असून आपण आल्या नंतर अनेक संशोधक, प्राध्यापक यांना परदेशी पाठवून नवनवे या क्षेत्रातील तंत्रज्ञान शिकण्यासाठी पाठविण्यात आले आहे. येणाऱ्या काळात अनेक बियाण्यामध्ये, आणि इतर पिका मध्ये आम्ही संशोधन करू फक्त राज्यातीलच नाही तर देशभरातील शेतकऱ्यांना आमच्या संशोधनाचा फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला.

डॉ. धर्मराज गोखले यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमापूर्वी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम केला. त्यात या महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम इंगळे यांनी अत्यंत सुंदर लावणी नृत्य सादर केले. या विद्यार्थ्याने सतत 12 तास लावणी नृत्य केले आहे. त्या नृत्याची लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. या विद्यार्थ्यांचे कृषी मंत्र्यांनी सत्कार करून विशेष कौतुक केले.त्या बरोबर इतर सांस्कृतिक कार्यक्रम केलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

तेल बिया संशोधन केंद्रातील बियाणे साठवणूक गोडाऊनचे उदघाटन.

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या तेल बिया संशोधन केंद्रात बि – बियाणे साठवणुकीसाठी नवीन 100 बाय 50 चौ. फूटचे 80 लाख 60 हजार एवढ्या किंमतीचे गोडाऊन उभे केले आहे त्याचे उदघाटनही कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. यावेळी खा. हेमंत पाटील, कुलगुरू इंद्र मणि, मा. आ. पाशा पटेल, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!