देशात गाजलेल्या कल्पना गिरी खुन प्रकरणातील दोघांना जन्मठेप तर चौघांना सक्त मजुरीची शिक्षा.
लातूर दि 08 ऑक्टोबर लातूरातच नाही तर देशात गाजलेल्या कल्पना गिरी खुन प्रकरणातील दोन मुख्य आरोपिंना जन्मठेप तर चार आरोपीविरुद्ध सक्त मजुरीची शिक्षा आज न्यायालयाने सुनावली आहे. या प्रकरणात 126 साक्षीदार तपासण्यात आले असुन 1000 पेक्षा जास्त पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. 21 मार्च 2014 रोजी काँग्रेस युवा पदाधिकारी यांच्यात लागलेल्या निवडणूकीत कल्पना गिरीने निवडणूक लढवू नये या वादातून हा खुन झाला होता हे या निकालानंतर स्पष्ट झाले आहे.
कल्पना गिरी या दि 21 मार्च 2014 रोजी घरातून गेल्या होत्या तर त्यांचा मृतदेह दि 24 मार्च 2014 रोजी तुळजापूर जवळील तलावात आढळून आला होता. गिरी यांच्या भावाच्या फिर्यादीवरून बहिणीचे अपहरण करुन बलात्कार केला आणि खुन केला असल्याच्या फिर्यादीवरून दि 26 मार्च 2014 रोजी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी लगेचच पोलीसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले होते. यात महेंद्रसिंह चौहान आणि समीर किल्लारीकर या दोघांना अटक केली होती. यापैकी महेंद्रसिंह चौहान हा युवक कॉंग्रेसचा शहर अध्यक्ष आहे, तर समीर किल्लारीकर सदस्य आहे. समीर किल्लारीकर यानं कबुली जबाब दिला आहे की, महेंद्रसिंह चौहान आणि पीडित महिला यांच्यात त्या दिवशी वाद झाला होता. महेंद्रसिंह चौहान याचं फटकून वागणं पीडित महिलेला आवडत नव्हतं. तुळजापूर जवळील तलावात ढकलून आरोपीनं त्यांचा खून केला होता. महिलेने युवक कॉंग्रेसची निवडणूक लढवू नये, असा आरोपींचा आग्रह होता. मात्र तिनं या निवडणुकीत सहभाग घेतल्यानं त्यांना युवक कॉंग्रेसचे हे पदाधिकारी जागोजागी अपमानित करत होते. युवक कॉंग्रेसवर मयत महिलेच्या वडिलांना आधीपासूनच संशय होता आणि वडिलांचा संशय शेवटी खराच ठरला.
तपासासाठी नऊ वर्ष लागलेल्या या प्रकरणाचा निकाल आज लागला असुन या प्रकरणी स्थानिक पोलीस ते सीबीआय अशा पाच तपास यंत्रणांनी तपास पूर्ण केला आहे.