प्रति मेट्रिक टन ३१६९.१५ रुपयांचा विक्रमी दर जाहीर; मांजरा परिवाराची परंपरा कायम

लातूर (दि. १० जून २०२६): सहकार क्षेत्रातील मानाचा तुरा असलेल्या रेणापूर येथील रेणा सहकारी साखर कारखान्याने आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळत गळीत हंगाम २०२५-२६ चे अंतिम ऊस बिल त्यांच्या खात्यावर वर्ग केले आहे. कारखान्याचे संस्थापक व सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, ३१६९.१५ रुपये प्रति मेट्रिक टन इतका अंतिम दर दिल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

शेतकऱ्यांना दिला शब्द पाळला!

​हंगाम सुरु होण्यापूर्वीच संस्थापक दिलीपरावजी देशमुख यांनी शेतकऱ्यांना ३१५० रुपयांपेक्षा जास्त दर देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, संचालक मंडळाने ३१६९.१५ रुपयांचा अंतिम दर निश्चित करून सहकार क्षेत्रातील विश्वासार्हता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

आकडेवारीवर एक नजर:

  • एकूण अंतिम दर: ३१६९.१५ रुपये प्रति मेट्रिक टन.
  • यापूर्वी दिलेली रक्कम: २८५० रुपये प्रति मेट्रिक टन.
  • आता खात्यात जमा झालेली रक्कम: ३१९.१५ रुपये प्रति मेट्रिक टन.

खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना मोठा आधार

​अस्मानी संकट आणि शेतीमालाच्या भावातील अनिश्चिततेच्या काळात, खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वीच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याने त्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. आमदार अमित विलासरावजी देशमुख आणि माजी आमदार धिरज विलासरावजी देशमुख यांच्या सहकार्यामुळे कारखान्याचा हा हंगाम यशस्वीरित्या संपन्न झाला असून, कारखान्याचे चेअरमन अनंतराव ठाकूर-देशमुख, व्हाईस चेअरमन प्रवीण पाटील व संचालक मंडळाने या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना:

ज्या ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी २०२५-२६ च्या गळीत हंगामात रेणा साखर कारखान्याला ऊस पुरवठा केला आहे, त्यांनी संबंधित रकमेसाठी आपल्या बँक शाखेशी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक यांनी केले आहे.

You cannot copy content of this page

error: Content is protected !!