जिद्द स्पर्धा परीक्षेतील श्रमाचीजिद्द स्पर्धा परीक्षेतील श्रमाची

एस.टी.ने प्रवास करत होतो, महिला कंडक्टर होती. भराभर तिकीट वाटप, पैसे देण्याघेण्यातली चपळता, इतरांपेक्षा वेगाने केलेला प्रवासी, तिकिटे व पैशांचा हिशेब माझे लक्ष वेधुन घेत होता. सर्व हिशेब पूर्णकरुन बसवर आत्मविश्वासाने तिने टाकलेली नजर व केलेली स्वतःची खातरी हे भाव तिच्या चेहर्‍यावर होते.

ती आपल्या सिटवर बसली, बॅगेतून पुस्तक व छोटी टीप्पण वही पेन्सिल काढून तिने वाचनास सुरुवात केली. पुढिल दोन तासांनी चहापाण्याचा थांबा होता, त्यामुळे ती वाचनात मग्न होती. दोन तासांनी ठराविक हाॅटेलवर गाडी थांबली, खणखणित आवाजात तिने गाडी केवळ पंधरा मिनिटेच थांबेल ही सुचना देवून, स्वतःचा डबा काढला व पोळी भाजी खाण्याससुरुवात केली. मी चहा न घेताच परत बसमधे आलो, तिच्या वाचनाबद्य औत्सुक्य होते. पुस्तक पाहुन मी उडालो, सहसा तरुण मुलमुली अशी पुस्तक वाचत नाहीत, पुस्तक होते, नरहर कुरुंदकरांचे “जागर”. मी तिला या पुस्तकाच्या निवडीबद्दल विचारले. मग तीने थोडक्यात सांगायला सुरुवात केली. ती खेडेगावातली, वडीलांची तीन एकर शेती, लहान दोन भाऊ, वेडसर काका, वडलांनी गेल्याच वर्षी आत्माहत्या केली. सर्व भार हीच्यावर येवून पडला. बीए. पास झाली व एस.टी.त कंडक्टर म्हणून मुलाखतिला गेली. आत्माहत्याग्रस्त म्हणून अनुकंपा न दाखवता, माझ्या गुणांवर नोकरी द्या असे तिने सांगितले.

वीसएक वर्षाची ही काळीसावळी, तरतरीत नाकेली, टापटीप मुलगी मला हिराॅईन पेक्षा जास्त भावली. आता नोकरी बरोबर राज्य स्पर्धा परिक्षेचा ती अभ्यास करत आहे. समाजशास्त्र केवळ अभ्यासक्रमातुन समजत नाही तर कुरुंदकर, इरावती कर्वे यांच्या लिखाणातुन या विषयांचे आकलन होते, हा तिचा विश्वास पाहुन चक्रावून गेलो. तिने त्या दिवशी धक्केच द्यायचे ठरवले होते. तिने वसंतराव नगरकरांचे “जेनेसिस आॅफ पाकिस्तान” पटवर्धनांचे ” “कम्युनल ट्रँगल” अश्या बर्‍याच लेखकांच्या पुस्तकांचा उल्लेख केला.

घरची शेती बागायती करायची, त्यासाठी मेहनत, नोकरी, एम.ए.चा व स्पर्धा परिक्षांचा अभ्यास. खरच ही अष्टभूजा भासली.मी तिच्या डोक्यावर हातठेवून शुभेच्छा व आशीर्वाद दिले, तर चक्क माझ्या पाया पडली. नरहर कुरुंदकरांची जवळ जवळ सर्व पुस्तके माझ्या संग्रही आहेत, ती मी तिला देवू केली, व सांगितले की मी स्वतः ती तुझ्या घरपोच करीन, तुझा वेळ वाया जायला नको ही भावना.क्षणंक्षणांचा व वेळेचे गणित तिच्या डायरीत मी वाचले.

वडलांच्या आत्महत्येबद्दल ती सर्व दोष वडलांना देते, कोणताही कडवटपणा सरकार बद्दल तिला नाही. जुगार व व्यसन म्हणून ते कर्जबाजारी झाले होते, ही सच्चाई तिने लपवली नाही. की फालतू अवडंबर, नव्हते. सरकारनी मला एस.टी.त सामावले असल्याचा कृतज्ञ भाव तिच्या शब्दाशब्दात होता.

सलाम या रणरागिणीला! व अनेक अनेक शुभेच्छा. लवकरच तिला लालदिव्याच्या गाडीतुन दिमाखाने मिरवायला मिळो ही इच्छा

लेखन भाव : सुरेश शहापूरकर

#viralpost

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!