दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले सराईत गुन्हेगारांना पोलीसांनी केले जेरबंद
विवेकानंद चौक पोलिसांचे त्वरित कोम्बिंग ऑपरेशन यशस्वी.
लातूर प्रतिनिधी : लातूर शहरातील रिंगरोड लगतच्या अर्पाटमेंटच्या शेजारील शेतात दरोडा टाकण्याच्या तयारी असलेल्या चार सराईत गुन्हेगारांना विवेकानंद चौक पोलिसांनी कोम्बिग ऑपरेशन राबवून शस्त्रासह जेरबंद केल्याची कारवाई १८ ते १९ मार्चच्या मध्यरात्री करण्यात आली आहे. अशी माहिती आज १९ मार्च रोजी पोलिसांनी दिली आहे. १८ ते १९ मार्चच्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाणे विवेकानंद चौकची रात्रगस्त सुरू असताना गस्तीवरील सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार यांना माहिती मिळाली की, एका अपार्टमेंटच्या बाजूच्या शेतामध्ये, रिंग रोड लगत दरोडा टाकण्याच्या उद्देशाने काही सराईत गुन्हेगार एकत्र जमून लपून बसले आहेत. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार यांनी तात्काळ सदरची माहिती वरिष्ठांना कळविली. त्यावरून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच चार्ली पेट्रोलिंग वरील पोलीस अंमलदारांना तात्काळ बोलावून घेऊन त्यांचे पथके तयार करून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्या गुन्हेगारांच्या ठिकाणाला चोहोबाजीने वेढा घालून दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या ईश्वर गजेंद्र कांबळे, वय २१ वर्ष, प्रफुल श्रीमंत गायकवाड, वय २७ वर्ष, महादेव अशोक पाटोळे, वय २२ वर्ष, राहुल महादेव कसबे, वय २२ वर्ष या चार गुन्हेगारांना एक लोखंडी बतई, कोयता, चोपर, लोखंडी कत्ती अशा घातक शस्त्रासह सदर मोठ्या सिताफिने ताब्यात घेतले, मात्र अंधाराचा फायदा घेऊन मेहबूब उर्फ गोपाळ करीम शेख, वय २८ वर्ष हा गुन्हेगार पळून गेला असून पोलीस पथके त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात सदर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी गोणारकर हे करीत आहेत