विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 30 मार्चपासून ‘मिशन थायरॉईड’ सुरु होणार

लातूर दि 30 मार्च मिशन थायरॉईड हे अभियान दिनांक 30 मार्च, 2023 पासून हाती घेण्यात आलेले आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या वरतीने राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात थायरॉईड निदान आणि उपचार करण्यात येणार आहे, अशी माहिती लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांनी दिली.

आजमितीला 1 लाख स्त्रियांमध्ये अंदाजे 2000 स्त्रियांना दृश्य स्वरुपात थायरॉईडची गाठ मानेवर दिसून येते. त्याचप्रमाणे अनेक महिलांना थायरॉईडची गाठ मानेवर दिसत नसताना देखील विविध थायरॉईडचे आजार झालेले आहेत. त्यातील ब-याचशा थायरॉईडच्या आजारांचे दीर्घकाळापर्यंत निदान देखील होत नाही अशा सर्व स्त्रिया तसेच पुरुष व बालकांना देखील या संपूर्ण अभियानाचा फायदा होणार आहे.

अनेकदा थायरॉईडच्या रोगांनी ग्रस्त स्त्री व पुरुषांना आळस, स्थूलपणा, शरीरावर सूज येणे, भूक न लागतादेखील वजन वाढणे, आवाजात एकप्रकारचा जाडपणा अथवा घोगरेपणा येणे ही लक्षणे थायरॉईड ग्रंथींचे काम मंदावल्याचे दर्शवितात. अनेकदा अशा स्त्रियांना वारंवार गर्भपाताला सामोरे जावे लागते. नवजात बालकांमध्ये थायरॉईड ग्रंथींच्या स्त्रावाअभावी मानसिक दुर्बल्य येऊन अशी बालके लहान खुरी व मंदबुध्दी होऊशकतात. थायरॉईड ग्रंथींच्या अतिस्त्रावामुळे अतिजास्त रोडपणा, छाती धडधड करणे व क्वचितप्रसंगी डोळे बाहेर येणेअथवा अंधत्वदेखील येऊ शकते.

मिशन थायरॉईड या अभियानाचे उद्दिष्ट थॉयराईड रोगासंदर्भात जनजागृती करणे व त्यासंबधात सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये थायरॉईड उपचारांसाठी विविध सोयी उपलब्ध करुन देणे हे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दर गुरुवारी दुपारी 12 वाजता औषधवैद्यकशास्त्र विभागा अंतर्गत विशेष थायरॉईड ओ.पी.डी. चालविली जाणार असून त्यामध्ये Physician, Surgeon, Endocrinologist, Pathologist, Sonologist व Biochemist अशा विविध तज्ञांचा एकत्र समावेश राहणार आहे. थायरॉईडच्या विविध आजारांच्या औषधोपचारांची व ब-याच दृश्य स्वरुपातील थायरॉईडचे विविध परिणाम जसे अन्न घेताना त्रास होणे, श्वास गुदमरणे तसेच थायरॉईडचे विविध कॅन्सर यांसंबधी शस्त्रक्रियाची सोय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

त्यामुळे थायरॉईडच्या विविध रोगांनी ग्रस्त असलेल्या गरजू रुग्णांनी दर गुरुवारी दुपारी 12 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील औषधवैद्यकशास्त्र विभागाअंतर्गत थायरॉईड क्लिनिकच्या सोयीचा लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे गिरीष महाजन, मंत्री, वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. अश्विनी जोशी, आयुक्त, राजीव निवतकर, संचालक, डॉ. दिलीप म्हैसेकर, सह संचालक, डॉ.अजय चंदनवाले व डॉ. पाखमोडे यांच्यातर्फे करण्यात येत आहे.

या अभियानाचे राज्यस्तरीय उद्घाटन गिरीष महाजन, मंत्री, वैद्यकीय शिक्षण यांच्या हस्ते होणार असून या अभियानाचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा असे आवाहन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता, डॉ. समिर जोशी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!