लातूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटसह हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस गारपीट होण्याचे हवामान विभागाचे संकेत.

शेतकरी व नागरिकांनी खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन.

लातूर, दि ०५ एप्रिल उद्या दि ०६ एप्रिल २०२३ रोजी लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि दिनांक ०७ एप्रिल २०२३ रोजी मेघगर्जना, वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय , लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

या कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेवून जिल्ह्यातील सर्व शेतकरी , नागरिक यांनी खबरदारी घ्यावी. विजांचा कडकडाट सुरु असताना बाहेर जाण्याचे टाळावे. शेतकऱ्यांनी दुपारी ३ ते ७ या वेळेत शेतीची व इतर कामे करू नयेत,कारण या कालावधीमध्ये विजा पडण्याची शक्यता अधिक असते. दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्रोताजवळ/विद्युत खांबाजवळ बांधू नयेत त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावीत. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून स्वतः सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा. जलसाठ्याजवळ / नदीजवळ जाऊ नये, आपल्या मुलांना जलसाठ्यावर / नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विध्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे, पुलावरून / नाल्यावरून पाणी वाहत असताना कोणीही स्वतः किंवा वाहनासह पूल / नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. काढणीसाठी ठेवलेली पिके सुरक्षितपणे झाकून ठेवावी. पाउस सुरु असताना विजेच्या तारा / जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते, तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी.असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!