उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी कृषी विकास पॅनल सज्ज.
आमदार श्री अमित देशमुखांनी केली फॅनलची भुमिका व पॅनल मधील उमेदवारांची पार्श्वभूमी स्पष्ट.
लातूर दि 21 एप्रिल आज लातूर येथे आमदार श्री अमित देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर निवडणुक २०२३ मधील कृषी विकास पॅनलची भूमिका आणि पॅनल मधील उमेदवारांची पार्श्वभूमी या संदर्भाने माहिती दिली. सर्व उमेदवार स्वच्छ प्रतिमेचे आणि कष्टकरी वर्गातील असून सार्वजनिक कार्यात अग्रेसर असणारे आहेत, त्याचबरोबर या संस्थेच्या कार्याला योग्य न्याय देणारे आहेत. त्यामुळे ते विक्रमी मताधिक्याने विजयी होऊन बाजार समितीच्या वैभवात भर घालतील असा विश्वास आमदार श्री देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
सभापती श्री ललित भाई शहा , उपसभापती श्री मनोज पाटील आणि त्यांच्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात अत्यंत उत्तम काम झाले आहे. शेतकरी त्याचबरोबर बाजार समितीमधील सर्व घटकांसाठी आवश्यक त्या योजना राबवून त्यांनी जवळपास १०० कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत जमा केल्या आहेत यातून या बाजार समितीची पत दहा पटीने वाढलेले आहे. आजवर झालेल्या कामाच्या शिदोरीवर कृषी विकास पॅनल ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकेल असा विश्वासही व्यक्त केला. या पुढील काळात त्यापेक्षा अधिक चांगले काम होईल अशी ग्वाहीही याप्रसंगी दिली.

पत्रकार परिषदेत कृषी विकास पॅनलच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. विद्यमान बाजार समितीचा पुनर्विकास करीत असतानाच माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या कार्यकाळात लातूर एमआयडीसी येथे मंजूर असलेल्या १५० एकर जागेवर नवीन आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उभारणीचे काम गतीने पूर्ण करण्यात येईल यासह लातूर बाजारपेठेचा लौकिक आणखीन वाढवण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.