लातूर- पुणे इंटरसिटी रेल्वेला खासदार श्रृंगारेनी दाखवला हिरवा झेंडा.
लातूरकरांचा पुणे प्रवास झाला अधिकच सोयीस्कर
लातूर दि 10 ऑक्टोबर आज हरंगुळ- पुणे- हरंगुळ या इंटरसिटी रेल्वेला खासदार श्री सुधाकर श्रृंगारे यांनी हिरवा झेंडा दाखवला असुन लातूरकरांचा प्रवास अधिकच सोयिस्कर झाला आहे तर लातूरकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. लातूर शहरातुन सर्वाधिक प्रवासी वाहतुक पुणे आणि मुंबईकडे होते. दररोज हजारो प्रवासी शेकडो खाजगी बस, खाजगी वाहने, रेल्वे व एस टी महामंडळाने प्रवास करतात पण हि वाहनेसुद्धा अपुरे पडतात. खासदार श्री सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रयत्नातून आणि पाठपुराव्याने या आज नव्याने सुरु झालेल्या हरंगुळ- पुणे- हरंगुळ या इंटरसिटी रेल्वेने हा प्रवासी भार कमी होऊन प्रवाश्यांची गैरसोय टळणार आहे. त्यामुळे लातूरकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला असल्याचे दिसत आहे.

यावेळी हरंगुळ- पुणे- हरंगुळ रेल्वेचा हरंगुळ स्थानकावर पुण्यावरून आलेल्या प्रवाशांचे आणि पुण्याहून लातूरकडे इंटरसिटी गाडी घेऊन आलेले लोको पायलट श्री. बी. के. घाडगे, सहाय्यक लोको पायलट श्री. दत्ता गोरे, श्री. प्रशांत जानराव यांचे स्वागत खासदार श्री सुधाकर श्रृंगारे यांनी केले व हरंगुळ वरून पुण्याला निघणाऱ्या या गाडीला हिरवा झेंडा दाखवून नवीन रेल्वे गाडीचा त्यांनी शुभारंभ केला. याप्रसंगी खासदार श्री श्रृंगारे यांनी नवीन रेल्वे सेवा कार्यरत केल्याबद्दल केंद्रिय रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री. रावसाहेब दानवे यांच्यासह मध्य रेल्वे विभागाचे अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच या रेल्वेचा थांबा हरंगुळ ऐवजी लातूर येथे करुन रेल्वे लातूर पर्यंत सुरू करण्यासह नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने योग्य ते बदल करण्यासाठी मी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाहीही यावेळी त्यांनी दिली आहे.

याप्रसंगी लातूर ग्रामीण भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. दिलीपराव मालक देशमुख, लातूर शहर भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. देवीदासजी काळे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. बळवंतराव जाधव, श्री. गणेश गोमचाळे, भाजपा लातूर चे माजी जिल्हाध्यक्ष श्री. गुरुनाथ मगे, श्री. तुकाराम गोरे, सौ. मीनाताई भोसले यांच्यासह नागरिक, रेल्वे प्रवासी आणि रेल्वेचे कर्मचारी उपस्थित होते.