उदगिर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या शांतीसाठी दिला पोलीसांनीच बोकडाचा बळी;
लातूर दि ०७ फेब्रुवारी दिवसेंदिवस पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालल्याने उदगीर ग्रामीण पोलीसांनी पोलीस ठाण्याच्या गेटवरच बोकडाचा बळी देऊन शांती केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण येथे घडली असल्याचे समजते. प्रसार माध्यमातून तो व्हायरल होणारा फोटो याची साक्ष देत असुन लातूर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असल्याचे समजते तर हा बोकडाचा बळी कोणी दिला आणि का दिला याचा जावई शोध घेणे सुरु असल्याचे लातूर नेता न्यूजने दूरध्वनीवरून संपर्क साधला असता समजते.
अंधश्रद्धेचा हा धक्कादायक प्रकार उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये घडला उसुन तो व्हायरल फोटो समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्यात दिवसेंदिवस अंधश्रद्धेतून अनेक बळी दिले जातात त्याला रोखण्यासाठी व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनेक कायदे तयार केली जात असतानाच हा डोळस प्रकार डोळे झाकून कसा केला गेला आहे यावर आता राज्यात प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी कारभार हाती घेतल्यापासून ठाण्याच्या हद्दीत अपघात आणि गंभीर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहेत. यावर उपाय शोधत बोकडाचा बळी देण्याची भन्नाट कल्पना एका अधिकाऱ्याच्या सुपीक डोक्यातून बाहेर आली आणि त्याला खतपाणी घालत वरिष्ठ अधिकाऱ्याने क्रमांक तीनच्या अधिकाऱ्यांवर बोकड आणण्याची आणि पुढील विधी पार पाडण्याची जबाबदारी सोपवली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली. यातील एका अधिकाऱ्याने एक बोकड आणि त्याला कापणारा कसाईला पोलिस ठाण्यात आणले. विशेष म्हणजे हा बोकड थेट पोलीस ठाण्याच्या गेटवरच कापण्यात आला असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
बोकडाचा बळी देऊन बनवलेल्या बिर्याणीवर ताव.
एका वेब न्युज पोर्टलवर प्रकाशित केलेल्या माहितीनुसार, या प्रकाराला संपूर्ण पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याची संमती होती. बोकड कापताना ते फोटो काढत व्यस्त होते. त्यानंतर या बोकडाच्या मटणाची बिर्याणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बिर्याणी याच भागातील एका फार्म हाऊसवर बनवून त्यावर पोलीसांनी जोरदार ताव मारले असल्याचेही माहिती आहे.
