अवैध सावकारांचे धाबे दणाणले; जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था करणार कारवाई.
लातूर दि 19 एप्रिल अवैध सावकारी विरोधात तक्रार निवारण दिनानिमित्त आज दिनांक 19 एप्रिल रोजी स्वामी विवेकानंद पोलीस ठाणे येथे लातूर शहरातील अवैध सावकारी धंदे चालवणाऱ्या सावकारावर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जिल्हा अधीक्षक यांच्या कडून कारवाई केली जाणार असून आता अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत.
चक्री व्याजात अडकलेल्या पीडितांना त्यांच्या अडचणीचे निराकरण व्हावे या उद्देशाने लातूर पोलिसांच्या वतीने स्वामी विवेकानंद पोलीस ठाणे येथे अवैध सावकारी तक्रार निवारण दिन असा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाचा लाभ घेत एकूण दहा पीडितांनी भेट घेऊन आपली तक्रार नोंदवली यामध्ये चार तक्रारी स्वामी विवेकानंद पोलीस ठाणे तीन तक्रारी एमआयडीसी दोन तक्रारी गांधी चौक तर एक छत्रपती शिवाजी महाराज चौक पोलीस ठाणे हद्दीतील तक्रार आहे. काही तक्रारी गंभीर आहेत तर काही तक्रारींचे आजच निराकरण करण्यात आले आहे. गंभीर तक्रारीवर तपासणी करून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय अधीक्षक लातूर यांच्या वतीने अवैध सावकाराविरोधात फिर्याद नोंदवली जाणार आहे. यामुळे अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत.
लातूर शहरात हजारो फायनान्स चालवणारे अवैध सावकार आहेत पण केवळ दहाच तक्रारी आल्या आहेत. याचा पोलिसांनी मागोवा घेतला असता काही अवैध सावकाराने पैसे देऊ केलेल्या पीडितांना व्याजदरात भरघोस सूट देऊन या अवैध सावकारी विरोधात तक्रार निवारण उपक्रमात सामील न होण्याचे आवाहन केले आहे अशी ही माहिती प्राप्त झाल्याचे समजते.
अवैध सावकारी विरोधात तक्रार निवारण दिन या उपक्रमात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय अधीक्षक एस के सारोळे व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय अधीक्षक एस बी काटे यांच्या समवेत लातूर शहर उप विभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत, स्वामी विवेकानंद पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक संतोष पाटील, एमआयडीसी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकते, गांधी चौक पोलीस स्टेशन ए एस आय मोमीन यांची उपस्थिती होती.