जिल्हाधिकारी कार्यालयातील अभ्यागत कक्षाचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन
▪️बांबूपासून बनवलेल्या अभिनव कक्षात नागरिकांसाठी विविध सुविधा.
▪️१०० दिवसीय कृती कार्यक्रमांतर्गत उपक्रम.
लातूर, दि. ०१ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या १०० दिवसीय कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात बांबूपासून आगळावेगळा अभ्यागत कक्ष तयार करण्यात आला आहे. या अभ्यागत कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते गुरुवारी झाले.

खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, अहिल्या गाठाळ, संगीता टकले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्यातील विविध भागातून आपल्या कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अभ्यागत कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. बांबूपासून बनविलेल्या विविध वस्तूंचा वापर या कक्षात करण्यात आला आहे. याठिकाणी नागरिकांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, बसण्यासाठी खुर्ची, टेबल ठेवण्यात आले आहेत. तसेच शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी एलसीडी स्क्रीन लावण्यात आली आहे.