लातूर: भोंदूगिरीविरोधात 'अंनिस' आक्रमक; जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले निवेदनलातूर: भोंदूगिरीविरोधात 'अंनिस' आक्रमक; जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

​पोलीस प्रशासनाकडे प्रलंबित ५२ भोंदूंची यादी; लवकरच उचलबांगडी होण्याची शक्यता.

लातूर (प्रतिनिधी): राज्यात सध्या दैवी शक्ती, चमत्कार आणि अध्यात्माच्या नावाखाली सर्वसामान्यांची होणारी आर्थिक फसवणूक, मानसिक छळ आणि महिलांच्या शोषणाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) लातूर शाखेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि जिल्ह्यातील ५० हून अधिक भोंदू बाबांवर तातडीने कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.

राजकीय पुढाऱ्यांसाठी आचारसंहितेची मागणी

​अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या घटनांमध्ये अनेकदा राजकीय पुढारी आणि अधिकारी सहभागी असल्याचे दिसून येते. ही बाब गंभीर असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांसाठी ‘आचारसंहिता’ लागू करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनाकडे प्रलंबित ५२ भोंदूंची यादी

​’अंनिस’ने यापूर्वीच जिल्ह्यातील ५२ भोंदू बाबांची यादी पोलीस प्रशासनाला सादर केली आहे. मात्र, त्यावर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. या निवेदनाद्वारे खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:

  • विशेष कक्ष: प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करून तो कार्यान्वित करावा.
  • प्रशिक्षण: संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना जादूटोणाविरोधी कायद्याचे (२०१३) विशेष प्रशिक्षण द्यावे.
  • जिल्हा समिती बैठक: कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा समितीची तातडीने बैठक बोलवावी.
  • नवीन भोंदूंचा शोध: यापूर्वी दिलेल्या यादीव्यतिरिक्त नव्याने सक्रिय झालेल्या मांत्रिकांचा शोध घेऊन कारवाई करावी.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार

​केवळ कारवाई करून अंधश्रद्धा संपणार नाही, यासाठी भारतीय राज्यघटनेने दिलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि समाज पातळीवर जिल्हा प्रशासनाने जनजागृती मोहीम राबवावी, अशी आग्रही मागणीही यावेळी करण्यात आली.

​निवासी उपजिल्हाधिकारी माननीय नेटके साहेब व तहसीलदार यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी ‘अंनिस’चे राज्य अध्यक्ष माधव बावगे, राज्य प्रधानसचिव रुकसाना मुल्ला, राज्य सरचिटणीस उत्तरेश्वर बिराजदार, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ भिसे, राज्य कार्यवाह अनिल दरेकर, रणजीत आचार्य, जिल्हा प्रधानसचिव सुधीर भोसले, शहर कार्याध्यक्ष डॉ. गणेश गोमारे, पांडुरंग देडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!