बीडच्या युवराज पोठरेला “मिनी ऑलिम्पिक” तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक .
३८ व्या वर्षी एकामागोमाग सलग दुसरे सुवर्णपदक
बीड प्रतिनाधी – महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेत तायक्वांदो खेळात पोलीस उपनिरीक्षक युवराज सुभाष पोठरे याने वयाच्या ३८ व्या वर्षी पुन्हा एकदा सुवर्ण पदक जिंकण्याची किमया साधली आहे. “मिनी ऑलिम्पिक” खेळात सुवर्णपदक जिंकणारा तो बीड जिल्ह्यातील एकमेव खेळाडू ठरला असल्याची माहिती राष्ट्रीय प्रशिक्षक डॉ अविनाश बारगजे यांनी दिली.

बालेवाडी -माळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा नगरी, पुणे येथे १ ते १४ जानेवारी २०२३ दरम्यान महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेमध्ये तब्बल ४८ खेळ प्रकारांमध्ये २० कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्र राज्य शासनाच्या मदतीने या स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. तायक्वांदो या खेळ प्रकारात बीडचा राष्ट्रीय खेळाडू तथा पोलिस उपनिरीक्षक युवराज सुभाष पोठरे याने ८० किलो वजन गटात पुन्हा एकदा सर्व प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली व सुवर्णपदकावर पुन्हा एकदा आपले नाव कोरले. त्याने अवघ्या महिन्याभरात हे राज्य पातळीवर सलग दुसरे सुवर्णपदक पटकावले आहे. तब्बल १४ वर्षांच्या प्रदीर्घ अंतरानंतर त्याने ही दोन्ही सुवर्णपदके जिंकली आहेत. २००८ मध्ये त्याने राज्यस्तरीय वरिष्ठ गटात सुवर्णपदक जिंकून राष्ट्रीय पातळीवर कांस्यपदक जिंकले आहे. खेळावरील प्रचंड प्रेम, जिद्द, चिकाटी, मेहनत व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर पोलिस खात्यामध्ये नोकरीत स्थिरावल्यानंतर देखील खेळाची ओढ कमी न होऊ देता कठोर परिश्रम करून त्यानेही यश संपादन केले आहे. बीड जिल्हा संघाचा प्रशिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू अविनाश पांचाळ याने या स्पर्धेत काम पाहिले. या सुवर्णपदक विजेत्या खेळाडूस बीड जिल्हा क्रीडा संकुलातील तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रात डॉ अविनाश बारगजे यांच्यासह छत्रपती पुरस्कार विजेते प्रविण बोरसे व प्रविण सोनकूल यांचेही मार्गदर्शन लाभले आहे.
पदक विजेत्या सर्व खेळाडूंचे डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख, अरविंद विद्यागर, महाराष्ट्र असोसिएशनचे महासचिव मिलिंद पठारे, विनायक गायकवाड सर, बीड जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष नितीनचंद्र कोटेचा, दिनकर चौरे, डॉ अविनाश बारगजे, सौ.जया बारगजे,भरत पांचाळ, प्रसाद साहू, नितीन आंधळे, मनिष बनकर, डॉ शकील शेख, उज्वल गायकवाड, राष्ट्रीय खेळाडू सचिन जायभाये, नवीद शेख, शुभम गायकवाड, शुभम खिल्लारे,सचिन कातांगळे, अमित मोरे , कृष्णा उगलमुगले, अनिस शेख, बालाजी कराड, आदित्य भंडारे, सुशांत सोन्नर आदी वरिष्ठ खेळाडूंनी अभिनंदन करून आगामी राष्ट्रीय वरिष्ठ तायक्वांदो स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रचंड इच्छा शक्ती, जिद्द, विश्वास व कठोर परिश्रमाची कहाणी…. !!!
बीड जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचा राष्ट्रीय खेळाडू युवराज पोठरे (पोलिस उपनिरीक्षक) याने अफलातून कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राष्ट्रीय तायक्वांदो पदक विजेता असलेल्या युवराज याने वयाच्या ३८ व्या वर्षी देखील १८-२० वर्षांच्या युवा खेळाडूंना लाजवेल अशा अफलातून खेळाचे प्रदर्शन करुन पुरूषांच्या ८० किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. हे केवळ एक सुवर्ण पदक नसून एखाद्या हिंदी सिनेमाच्या कहाणीला लाजवेल अशा चॅम्पियन खेळाडूंच्या इच्छा शक्तीची, जिद्दीची, विश्वासाची, कठोर परिश्रमाची प्रेरणादायी यशोगाथा ठरली आहे. त्याच्या या विजयाचे वर्णन शब्दांत सांगायचं कठीण आहे. अगदी योद्धा मैदानावर लढतो तसाच तो लढला आणि जिंकला.. केवळ सुवर्णपदक नाही तर सर्व उपस्थितांची मने देखील त्याने पुन्हा एकदा जिंकली ..
नॉक आउट आणि युवराज !!
युवराज पोटरे यांच्या खेळाच्या कारकीर्दी मध्ये प्रत्येक स्पर्धेत प्रतिस्पर्ध्याला “नॉक आउट” करण्याची परंपरा त्यांनी या स्पर्धेतही कायम राखली. मुंबई, पुणे या महानगरातील प्रबळ दावेदार व संभाव्य विजेत्यांना लीलया नॉक आउट करून विरोधकांचे स्वप्न उधळून लावणारा खेळाडू म्हणून त्याने दबदबा निर्माण केला आहे.