प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून मिळावे यासाठी ‘केशवराज’चे शासनाकडे निवेदन.
लातूर दि ११ मार्च राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार ‘प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच मिळाले पाहिजे’ या मागणीचे निवेदन येथील श्री केशवराज माध्यमिक व प्राथमिक विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने काल दि १० मार्च रोजी लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे द्वारा महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री मा. शिक्षण मंत्री, राज्याचे मा.मुख्य सचिव यांना देण्यात आले. तसेच मा.शिक्षण संचालक, मा.शिक्षण उपसंचालक, मा.शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक यांनाही त्या त्या कार्यालयात जाऊन हे निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी श्री केशवराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री प्रदीप कुलकर्णी, उपमुख्याध्यापक मा.श्री महेश कस्तुरे,श्री केशवराज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री शिवाजी हेंडगे, पर्यवेक्षक श्री संदीप देशमुख, श्री बबन गायकवाड, तसेच श्री लक्ष्मीकांत कुलकर्णी (ज्येष्ठ शिक्षक), श्री सुहास कांबळे (लिपिक) यांची उपस्थिती होती.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई या संस्थेने पूर्वीपासूनच किमान प्राथमिक शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषा मराठीच असले पाहिजे असा आग्रह धरलेला आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये उल्लेखित केल्यानुसार इ.५ वी पर्यंत किमान शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषा मराठी व राजभाषा हिंदी असावे यासाठीचे श्री केशवराज माध्यमिक व प्राथमिक विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचारी यांच्या स्वाक्षरीचे एक निवेदन जिल्हाधिकारी लातूर यांना देण्यात आले.

लहान मुले महत्त्वाच्या संकल्पना आपल्या मातृभाषेतच अधिक प्रभावीपणे शिकत असतात व त्या संकल्पना त्यांना मातृभाषेतूनच अधिक समजतातही. मातृभाषा मराठी किंवा राजभाषा हिंदी माध्यमातून प्राथमिकचे शिक्षण मिळाले तर मुलांच्या मनावरचा ताणही कमी होऊन शिक्षण प्रक्रिया आनंददायी बनेल. या हेतूने मातृभाषेच्या माध्यमाचा आग्रह संस्थेने धरला आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या सारांशातील बिंदू क्र. ४.१७ मध्ये उल्लेखिल्यानुसार ज्ञानाचे भांडार व संस्काराची भाषा म्हणून संस्कृत भाषा शिकण्याची व्यवस्था पायाभूत शिक्षणापासूनच निर्माण करावी. वैदिक गणिताचा अंतर्भाव इयत्ता पहिली पासून गणित या विषयात करावा. अशा मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र शासनाने योग्य ती कार्यवाही करावी अशा आशयाचे हे निवेदन केशवराज माध्यमिक व प्राथमिक विद्यालयाच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे देण्यात आले.
