तायक्वांदो खेळाडूंना आवश्यक मूलभूत सुविधांसाठी प्रयत्न करणार – डॉ. सारिकाताई क्षीरसागर
बीड प्रतिनिधी : तायक्वांदो खेळाची बीड जिल्ह्याला मोठी परंपरा असून तायक्वांदो खेळाडूंना सरावासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधांसाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांनी जागतिक तायक्वांदो दिनानिमित्त आयोजित खेळाडूंच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना सांगितले.

४ सप्टेंबर रोजी जागतिक तायक्वांदो दिन सर्वत्र साजरा केला जातो. तायक्वांदो असोसिएशन ऑफ बीड संघटनेच्या वतीने जागतिक तायक्वांदो दिनाच्या निमित्ताने जिल्हा स्टेडियम येथील इंडोअर हॉल येथे राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार व बेल्ट वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे व जया बारगजे यांनी त्यांचे स्वागत केले. तायक्वांदो खेळाडूंनी यावेळी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अविनाश बारगजे यांनी केले. तायक्वांदो खेळातील संधी, बीड जिल्ह्याच्या खेळाडूंची कामगिरी व भविष्यातील नियोजनाबद्दल त्यांनी यावेळी माहिती दिली. याप्रसंगी उपस्थित गुणवंत खेळाडू व पालक यांना मार्गदर्शन करताना डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांनी आपले विचार मांडले. त्या म्हणाल्या की, तायक्वांदो खेळामुळे अनेक खेळाडूंना शासकीय सेवेमध्ये संधी मिळालेली आहे, शेकडो खेळाडूंनी देश पातळीवर व आंतरराष्ट्रीय पातळीवर बीड जिल्ह्याचे नावलौकिक वाढवले आहे. अशावेळी या खेळाला आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हाधिकारी तसेच शासन दरबारी प्रयत्न करून कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र, चांगल्या दर्जाच्या मॅट व अत्याधुनिक सेंसर सिस्टम सेट खेळाडूंना सरावासाठी उपलब्ध करून देण्यासाठी आपण जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या सोबतीने प्रयत्न करणार आहोत, असे त्या म्हणाल्या. राष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक डॉ. अविनाश बारगजे व जया बारगजे या दांपत्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांनी दोघांचे कौतुक केले.

तायक्वांदो खेळातील राष्ट्रीय खेळाडू डॉ. शेख शकील, पारस गुरखुदे, अक्षय पाहुणे, ऋत्विक तांदळे, देवेंद्र जोशी , सुदर्शन गायकवाड, रंजीत काकडे, सार्थक भाकरे ,यशस्वी चव्हाण, सृष्टी योगे आदी राष्ट्रीय खेळाडूंचा या वेळी डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक सचिन पवार , डॉक्टर सचिन जेथलिया, डॉक्टर शशिकांत ठोंबरे, प्रा. मोहित शिंदे , भूषण योगे यांच्यासह मोठ्या संख्येने पालक व शेकडो खेळाडू या वेळी उपस्थित होते.