मराठा आरक्षणासाठी इंद्रायणीत उडी घेऊन लातूरच्या माजी सरपंचाची आत्महत्या.
नातेवाईक शव घेऊन जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तहसीलसमोर आंदोलन सुरु.
शिरुर अनंतपाळ प्रतिनिधी : मराठा आरक्षणासाठी तालुक्यातील माजी सरपंच व्यंकट ढोपरे यांनी मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण द्यावे अशी चिठ्ठी लिहून इंद्रायणी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान त्यांचे शव शिरुर अनंतपाळ येथील तहसीलसमोर रुग्णवाहिकेतुन आणले असुन आज दि 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 च्या सुमारास मराठा आंदोलक व नातेवाईकांनी माजी सरपंचाने चिठ्ठीत लिहिलेल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय अंतविधी करणार नसल्याची भुमिका घेतली आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
ढोपरे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत “मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे. खूप वेळा सरपंच या नात्याने ते मि मिळवून देण्याचा प्रयत्न केला. माझ्या गावातील सर्व जातीधर्माच्या समाजाला घेऊन बऱ्याचवेळेस मोर्चामध्ये सहभाग घेऊन संघर्ष केला, पण सरकारला त्याबद्दल आतापर्यंत दया आली नाही. माझ्या मुलाचा कृषी खात्यात 2012 ला अनुकंपातत्त्वाखाली माझ्या पत्नीच्या वडिलांच्या जागी प्रस्ताव दाखल केला. त्यानंतर कागदपत्रे कृषी संचालक कार्यालयात जमा करा, असे पत्र देण्यात आले. त्यानुसार, सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. तरीसुद्धा आजी-आजोबांच्या जागेवर नोकरी देता येत नाही, अशी पत्राद्वारे माहिती दिली. ती जागा आमच्या हक्काची असून, त्याची पूर्ण फाइल माझ्या उंबरदरा या गावी घरी कपाटात आहे. अधिकाऱ्यांच्या अपेक्षेपोटी आम्ही डावलले गेलो. आमच्या पदरी निराशा टाकण्यात आली. आज रोजी माझा मुलगा बेकार फिरत आहे. मी सरपंच या नात्याने 2021 ला 65 वर्षीय निराधार लोकांच्या पगारासाठी शिरूर अनंतपाळ तहसीलदारांकडे 50 ते 60 लोकांचे पेपर देऊनदेखील त्या गरीब लोकांचे पगार शासन व प्रशासनाने केले नाहीत. हे शासन प्रशासन स्वत:ची खळगी भरण्यात व्यस्त आहे. जनतेला न्याय भेटत नाही. या निराशेपोटी मी माझी आहुती देत आहे.” असा उल्लेख असल्याचे समजते.