नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्याच्या विकासाला गती द्या – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
▪️लातूर शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रस्त्यांचे तांत्रिक सर्वेक्षण करून आराखडा तयार करा
▪️जिल्हा विकास आराखड्यातील कामांना प्राधान्य; प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण करा
▪️जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०२४-२५ च्या निधी खर्चाला, २०२५-२६ च्या नियोजनाला मंजुरी
लातूर, दि. २ मे : जिल्हा नियोजन समितीमार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून नागरिकांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण सुविधा देण्याला प्राधान्य द्यावे. यामाध्यमातून पायाभूत सुविधांची निर्मिती करून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात गुरुवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त देविदास जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांच्यासह अंमलबजावणी यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. आमदार विक्रम काळे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. लातूर जिल्हा विकास आराखड्यातील प्रस्तावित कामे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करावीत. गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नये, असे पालकमंत्री श्री. भोसले यांनी सांगितले. नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
लातूर शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील रस्त्यांचे तांत्रिक सर्वेक्षण करून उपाययोजनांचा आराखडा तयार करावा. यात शहरातील प्रमुख चौक, रिंग रोड आणि सर्व रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्थेचा समावेश करावा, असे पालकमंत्री श्री. भोसले यांनी निर्देशित केले. शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले.
खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार आणि आमदार रमेश कराड यांनी वीज वितरण, सिंचन प्रकल्पांची दुरुस्ती, वाहतूक कोंडी आणि पाणीपुरवठा यासारख्या विषयांवर आपल्या सूचना मांडल्या.

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी विकास योजनेअंतर्गत २०२४-२५ मध्ये झालेल्या निधी खर्चाला जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली. जिल्हा वार्षिक योजनेसाठी (सर्वसाधारण) २०२५-२६ करिता शासनाने ४४९ कोटी रुपये निश्चित केले असून, त्यानुसार तयार केलेल्या अंतिम आराखड्याचे सादरीकरण बैठकीत झाले. यात गाव तेथे स्मशानभूमी, गाव तेथे खोडा व हौदा, डायलिसिस आणि इतर सुविधांसाठी निधी प्रस्तावित आहे. तसेच, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी १२५ कोटी रुपये आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेसाठी ३.२३ कोटी रुपयांचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्याला बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रारंभी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी प्रास्ताविक केले, तर जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी सविस्तर सादरीकरण केले.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून बैठकीला सुरुवात झाली. ‘घर घर संविधान’ अभियानांतर्गत भारतीय संविधान उद्देशिकेच्या वाटप मोहिमेला पालकमंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते सुरुवात झाली. यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचनही करण्यात आले.
चोरी आणि सायबर फसवणूक प्रकरणांत पोलिसांनी तपास करून ताब्यात घेतलेला मुद्देमाल आणि रोख रक्कम संबंधित फिर्यादींना पालकमंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते परत करण्यात आली. तसेच, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने डिजिटल पशुधन माहिती कक्षांतर्गत तयार केलेल्या क्यूआर कोडचे पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.